क्षेत्र भैरवेश्वराची महती सांगणारे 'याना केव्हज...'


क्षेत्र भैरवेश्वराची महती सांगणारे 'याना केव्हज...'

नैसर्गिक उलथापालथीचा एक सुंदर आविष्कार म्हणून कर्नाटक राज्यातील सिरसी जवळील याना केव्हज अर्थात याना प्रस्तरखंड हे स्थळ ओळखले जाते. पर्यटकांच्या सहजी नजरेच्या टप्प्यात नसलेले त्यामानाने इथे कमी गर्दी असते मात्र तरीही अलीकडे सामाजमाध्यमांच्या उपलब्धतेमुळे हे स्थळ बहुतांशी परिचित झाले आहे. याना स्थळ हे भैरवक्षेत्र नावानेही ओळखले जाते. प्रचंड मोठे, नैसर्गिक काळा पाषाण लाभलेले, पाहताक्षणी असंख्य समशेरी उलट्या दिशेने उभ्या करून ठेवल्या असल्याचा भास निर्माण करणारे अजस्त्र असे धारदार प्रस्तरखंड, संपूर्ण परिसरात पसरलेली विशिष्ट अशी अगदी संपूर्ण काळीं माती ही या क्षेत्राची वैशिष्ट्ये आपल्याला या क्षेत्राच्या धार्मिक, पौराणिक इतिहासाचा शोध घेण्यास भाग पाडतात. रावसाहेब, अभिजित, प्रशांत या नेहमीच्याच सोबत्यांसोबत नुकताच या ठिकाणी आम्ही अभ्यासदौरा करून आलो. 


याना केव्हज (भैरवक्षेत्र) संदर्भात स्कंद पुराणाच्या सह्याद्रीखंडात उल्लेख सापडतात. संस्कृतमधील भैरव पुराणात या क्षेत्राची एकंदर माहिती दिली आहे. भगवान भैरवेश्वर हे इथले आद्य दैवत. या स्थळाची पौराणिक माहितीही अत्यंत रंजक आहे. भगवान विष्णू यांनी नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. त्याची भार्या पद्मावती ही आपल्या कृष्णाक्ष आणि रक्ताक्ष या मुलांना घेऊन ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येला बसली. ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्यांनी तिच्या रक्ताक्ष नावाच्या मुलाला वर दिला की जर त्यास पुरुष योध्याचा बाण लागून त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडला तर त्याच्यासारखाचा दुसरा शूर पुरुष जन्म घेईल. ब्रह्मदेवांनी कृष्णाक्षला एक दिव्य वायुवाहन अर्थात विमान भेट दिले. ब्रह्मदेवाच्या वरदानाने पद्मावतीचे हे दोन्ही पुत्र अहंकाराने वागू लागले. त्यांनी आपल्या शक्तीचा दुरुपयोग सुरू केला आणि वरूणराजावर सर्वप्रथम हल्ला केला. यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी वरुणराज सह्याद्रीच्या निबिड अरण्यात आश्रयास आले.


दोघेही इतके अहंकारी वृत्तीने वागू लागले की त्यांनी थेट भगवान विष्णुकडे असलेला कौस्तुभ मणी घेण्यासाठी वैकुंठावर हल्ला केला. यावेळी भगवान विष्णूंना ब्रह्मदेवाने शिव-पार्वती सहित सह्याद्री पर्वतामध्ये आश्रय घेण्याचा सल्ला दिला. विष्णू सोबत शिव-पार्वती यांना घेऊन सह्याद्रीत आश्रयास आले. त्यांचा माग काढत हिरण्यकश्यपूचे दोन्ही पुत्र या पर्वतामध्ये दाखल झाले आणि जोरदार हल्ला सुरू केला. या राक्षसांकडून निष्पाप साधू संतांवर प्रचंड हल्ले होऊन त्यांचा मृत्यू होऊ लागला. हे पाहून महादेव संतापले आणि त्यांनी आपला तृतीय नेत्र उघडला. त्यांची दृष्टी या राक्षसबंधूंच्या वायुवाहनावर पडताच त्याचे तुकडे झाले मात्र दोघांनीही उड्या मरून स्वतःस वाचवले आणि पुन्हा हल्ले सुरू केले. हे तुंबळ युद्ध प्रचंड विनाश घडवणारे होते. दोघाही राक्षसबंधूंना संपवण्यासाठी महादेवांनी भैरव अवतार धारण केला. त्यांनी सह्याद्रीचा एक संपूर्ण शिलाखंड आपल्या पायांनी आघात करून त्यांच्याकडे भिरकावला. शिलखंडाचे दोन तुकडे झाले. यात कृष्णाक्ष मारला गेला आणि त्रिशूळाच्या आघातांनी त्याच्या शरीराचे तुकडे झाले. 


रक्ताक्ष प्रचंड जखमी झाला. त्याच्या हाती जळता बाण होता हे पार्वती देवीने पाहिले आणि या जळत्या बाणाने हल्ला करण्यापूर्वीच त्यास मारणे गरजेचे आहे हे ओळखून पार्वतीने एका अत्यंत सुंदर नारीचे रूप धारण केले. पुराणात त्यास 'जगन्मोहिनी' रूप म्हटले जाते. रक्ताक्ष या रूपावर भाळला आणि त्याने तिच्याकडे प्रेमयाचना सुरू केली. मात्र हाती असलेली शस्त्रे त्यागण्यास सांगितले. या संधीचा फायदा उठवत जगन्मोहिनी अवतारात असलेल्या पार्वती देवीने क्रुद्ध चंडी अवतार धारण केला आणि रक्ताक्षला यमसदनी पाठवले. दोन्ही राक्षसबंधूंचा वध झाल्याने युद्ध थांबले. या युद्धाने हा संपूर्ण परिसर धुराने भरून गेला. यामुळे महादेवांनी वरूणराजाला सांगून इथे पर्जन्यवृष्टी करवली आणि परिसर स्वछ झाला. चंडी अवतारात असलेल्या पर्वतीदेवीने स्वतःला एका अखंड प्रवाही नदीत रूपांतरित केले जी पुढे चंडी नदी म्हणून प्रसिद्ध झाली. सह्याद्रीक्षेत्र भगवान शिव-पर्वतीमुळे भयमुक्त झाल्याने सह्याद्रीराजाने महादेवांना या स्थळी आपले कायमचे वास्तव्य करण्याची विनंती केली. महादेवांनी या विनंतीला मान देऊन भैरव अवतारात आपले इथे वास्तव्य केले तेच आज 'क्षेत्र भैरवेश्वर' या नावाने ओळखले जाते. महादेवांसोबत गणेश, पार्वती, विष्णू यांचेही इथे वास्तव्य आहे. 


आणखी एका आख्यायिकेनुसार वृकासुर नावाच्या राक्षसाने अमरत्वाचे वरदान प्राप्त व्हावे म्हणून भगवान महादेव यांची घोर तपश्चर्या सुरू केली. महादेवांनी प्रसन्न होऊन त्यास वर दिला की तो ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल तो तात्काळ भस्मसात होईल. हाच भस्मासुर म्हणून ओळखला जातो. वर देताच त्याने याचा सर्वप्रथम प्रयोग महादेवांवरच करण्याचा प्रयत्न केला. यापासून वाचण्यासाठी महादेव भैरवक्षेत्री आले. भगवान विष्णूंनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी  मोहिनी रूपातील नृत्यांगणेचे रूप धारण केले. यास मोहिनी अवतार म्हटले जाते. भस्मासुर विष्णूच्या या अवतारास भाळला. मोहिनी अवतारातील विष्णूंनी भस्मासुरास नृत्य करण्याची अट घातली. भस्मासुरने ही अट मान्य केली. मोहिनी आणि भस्मासुर यांचे हे नृत्य अनेक दिवस चालले. मोहिनीच्या नृत्यावर अनुरक्त होऊन तोही तिच्यासारखेच नृत्य करू लागला. संधी साधून मोहिनी अवतारातील विष्णूंनी आपला हात स्वतःच्याच डोक्यावर ठेवला. भस्मासुर इथे फसला आणि त्यानेही आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. तत्क्षणी महादेवांनी दिलेल्या वरानुसार त्याच्या शरीराचे भस्म झाले. हे अत्यंत काळ्या रंगाचे भस्म इथल्या मातीत मिसळयाने आजही इथला परिसर काळ्याशार मातीने भरलेला आहे अशी आख्यायिका आहे. 


इथे दोन प्रचंड मोठे असे शिलाखंड आहेत. त्यांची रचनाही इतकी विलक्षण आहे की त्यांच्या निर्मितीसंदर्भात झालेल्या भूगर्भीय हालचालींचा बदल किती प्रचंड असावा हे लक्षात येते. उभे सरळसोट, काळेकरंद, धारदार, टोकदार अन एकमेकांपासून बरेचसे सुटलेले हे पर्वतखंड पाहताना असे वाटते की जणू आत्ताच कोसळतील. स्थानिक मान्यतेनूसार यातील एक शिलाखंड हा भगवान विष्णू यांच्या मोहिनी रूपातील आहे तर काही अंतरावर असलेला त्यापेक्षाही मोठा शिलाखंड हा भैरवेश्वराचा आहे. दोन्हीही शिलाखंड तडे गेलेल्या अजस्त्र पाषाणासारखे दिसतात. भैरवेश्वर खंडाच्या मधोमध एक छोटा शिलाखंड आहे जो भस्म झालेला भस्मासुर असल्याचे भाविकांत मान्यता आहे. हा भस्मासुर शिलाखंड इतर पाषाणापेक्षा थोडासा उष्ण असतो अशी समजूत आहे. इथेच वर एकेठिकाणी शीतलजलाची अखंड धार सुरू असते जी पुढे आश्चर्यकारकरित्या भैरवेश्वराच्या मुख्य मंदिरात प्रगटते. ही जलधार महादेवाच्या जटांमधून मुख्य मंदिरात प्रगटते म्हणून त्यास भागीरथी जलप्रवाह असेही म्हटले जाते. भैरवेश्वराचे मुख्य मंदिर हे पुरातन असून लाकडी बांधकामाचे आहे. इथे एका गुहेत पाषाणाच्या शिळेवर स्वयंभू अवतारात प्रगटलेले महादेव आहेत. या संपूर्ण पाषाणखंडाला प्रदक्षिणा करता येते. मंदिर व्यवस्थापनाने आवश्यक तिथे प्रदक्षिणा मार्ग बांधल्याने अनेक भाविक ही प्रदक्षिणा आवर्जून करतात. 


इथे पावसाळ्यात जाण्याचे काहीसे जिकिरीचे आहे. स्थळाकडे जाणारा संपूर्ण मार्ग जंगली आहे. पक्का मार्ग नसल्याने अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. दोन अडीच किमी वर वाहने थांबवून पायी जावे लागते. दुसरे महत्वाचे म्हणजे इथे असलेल्या जळवा. इथे प्रचंड जळू आहेत. शरीराला चिकटून पोटभर रक्त पिल्याशिवाय त्या सोडत नाहीत. आम्ही गेलो तेव्हा कोरडे वातावरण असल्याने अर्थातच आम्हाला याचा अनुभव आला नाही. असे म्हणतात की हे जळू भस्मासुराच्या राखेपासून तयार झाले आहेत आणि आजही ते भस्मासुराच्या रुपात लोकांना त्रास देत असतात. हे क्षेत्र अलीकडे प्रसिद्ध होण्याचे आणखी एक कारण म्हणजे दाक्षिणात्य चित्रपट 'मंडारा हुवे' मधे इथले चित्रीकरण केले गेले आहे. पौराणिकतेचा स्पर्श झालेले हे स्थळ भूगर्भीय हलचालींच्या अभ्यासासाठीही अत्यंत योग्य आहे. गर्द वनराजीत वसलेले हे याना केव्हज अर्थात क्षेत्र भैरवेश्वर प्रत्येकाने एकदातरी पाहिले पाहिजेच... 

- संतोष काशीद. (मो. ९९२३९७५०५३)

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट