कवठे गावातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित.

कवठे गावातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित. 


पूर्वी युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सामान्य सैनिकांच्या स्मरणार्थ एका दगडी शिळेवर शिल्पकाम करून त्याची स्मृति जपली जायची. बहुतांशी या दगडी शिळा आयताकृती असत. क्वचित केव्हा त्या चौरसाकृती किंवा अगदी गोलाकारही असत. इतिहासात या दगडी शिळा ' विरगळ ' म्हणून ओळखल्या जातात. एकाच दगडावर बहुतेक वेळा तिन स्वतंत्र खोरणे (कप्पे) तयार करून वीरगती प्राप्त झालेल्या योध्याचा जिवनप्रवास रेखाटला जातो. या विरगळांच्या सर्वात खाली आडव्या रुंद दगडी पट्टीवर योध्याचे मृतावस्थेतील आकृति कोरलेली असते. बहुतेक वेळा हा वीर पाठीवर पहुडलेला असतो. इथून पुढील खोरणांत त्याचे अखेरचे काही क्षण कोरले जातात. तीन पैकी सर्वात खालच्या पहिल्या खोरणात त्या योध्याच्या अखेरच्या युद्ध संग्रामातील युद्धाचा प्रसंग रेखला जातो. 



यात धनुर्युद्ध, खडगयुद्ध, भालायुद्ध, मल्लयुद्ध ई. प्रकारच्या आरेखनांचा समावेश असतो. मधल्या खोरणात त्याचे इहलोक सोडून जातानाचे आरेखन असते. योध्याच्या मृत्युनंतर त्याला घेऊन जाण्यासाठी आलेल्या देवदुतांसोबतचे मृत्युलोकातील प्रस्थान यात कोरले जाते. बहुतेक वेळा योध्यासोबत दोन पुरुष देवदूत असतात. या देवदुतांच्या कटीवस्त्रावरूंन तसेच वक्षस्थलावरून ते स्त्री की पुरुष देवदूत आहेत हे ओळखता येते. सर्वात वरच्या खोरणात मृत योद्धा आपल्या इष्ट देवतेच्या पुजा करतानाचा प्रसंग कोरला जातो. इथे तो योद्धा ब्राह्मण असेल तर विष्णुपादुकांची पूजा आणि ब्रम्हणेतर असेल तर शिवपिंडीची पूजा करतानाचा आकृतीबंध असतो. विरगळाच्या माथ्यावर बहुतेक वेळा चंद्र सूर्य प्रतिमा उठवलेल्या असतात. काही वेळा इथे मंदिराच्या कळसासारखे वरच्या बाजूला निमुळते होत गेलेले कोरीवकामही दिसून येते. चंद्र सूर्य प्रतिमा त्या योध्याच्या अमरत्वाचं प्रतीक होत. 


हे विरगळ म्हणजे त्या त्या परिसराचा मौल्यवान ऐतिहासिक वारसा असून गावातील योध्यांचे हौतात्म्य दर्शवतात. त्यामुळे संबंधीत गावाला पराक्रमाचा असलेला समृद्ध वारसाही आपल्याला अवलोकन करता येतो. हे सर्व इथे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे सुदैवाने आपल्या कवठे गावामधे असे काही विरगळ आज आपल्याला आढळतात. दुर्दैवाने याविषयी कोणाला अधिक कल्पना नसल्यामुळे म्हणा किंवा त्या शिल्परचनांचा अभ्यास नसल्यामुळे म्हणा याकडे दुर्लक्ष केले जाते आणि म्हणून हे विरगळ आज वर्षानुवर्षे अक्षरशः धूळखात पडलेले आहेत. कवठ्यातील या विरगळ संबंधी माहिती घेणे गरजेचे तर आहेच पण त्यांचं संवर्धन होणेही तितकेच गरजेचे आहे. या लेखात मला आढळलेल्या आपल्या गावातील एकूण तीन विरगळांची थोडक्यात माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे. या तीनही विरगळांची माहिती आणि स्थान पुढीलप्रमाणे. 


१) कवठ्यातील पहिला विरगळ कृष्णा नदीतीरी असलेल्या महादेव मंदिरासमोर आहे. विरगळ फारच सुंदर आहे. सुमारे दीड फुट रुंद आणि तीन ते चार फुट लांब असलेला हा विरगळ सध्या अर्ध्याहून अधिक मातीत गाडला गेला आहे. एकूण तीन खोरणांपैकी दूसरे खोरण अर्धवट तर सर्वात वरचे खोरण पूर्णावस्थेत दिसते. मधल्या जाडसर दगडी पट्टीने विभागलेल्या याच्या मधल्या खोरणात योध्याला घेऊन जाणारे देवदूत अस्पष्टसे दिसत आहेत. सर्वात वरचे खोरण मात्र स्पष्ट दिसत असून त्यात तो वीर आपल्या इष्ट देवतेची अर्थात महादेवाची पूजा करताना दिसतोय. सदर पिंड अर्धवट फुटलेल्या अवस्थेत असून बाजूच्या आकृत्याही काळाच्या ओघात झिजलेल्या आहेत. याच्या माथ्यावर कळासाकृती भार कोरलेला आहे. चुण्याच्या रंगामुळे सहजी पाहता येत नसले तरी  बारकाइने पाहिल्यास आपण त्यावरील या आकृत्या निटशा नक्कीच पाहू शकतो. सोबतच्या छायाचित्रात आपण तो विरगळ पाहू शकतो. 


२) दुसरा विरगळ पहिल्या विरगळाच्या शेजारीच असून मोठ्या प्रमाणात झिज झाल्याने त्यावरील आकृतीबंध स्पष्टसे दिसून येत नाहीत. पहिल्या विरगळ पेक्षा हा काहीसा अधिक रुंद आणि उंच आहे. काळ्या पाषाणात कोरल्यामुळे हा विरगळ अधिक उठावदार दिसत आहे. याचं मधलं खोरण पूर्णतः दिसत आहे मात्र त्यातील मानवी आकृत्या अस्पष्ट आहेत. वरच्या बाजूने तिरकस फुटलेला हा विरगळ अर्धवट मातीमधे मुजला गेला आहे. याचा वरचा भाग पूर्णतः नष्ट झाला आहे. त्यामुळे यावरील योध्याचा इष्ट देवतेच्या पूजनाचा प्रसंग दिसून येत नाही. सोबतच्या छायाचित्रात आपण तो विरगळ पाहू शकतो. 

३) या शृंखलेतील तीसरा विरगळ जिर्णोद्धारीत हनुमान मंदिराशेजारी नव्याने बांधलेल्या पायरीवर असून गावातील नाल्याच्या शेजारी असल्याने याची सर्वाधिक अप्रतिष्ठा होत आहे. पहिल्या प्रमानेच याचीही मोजमापे असून हा विरगळही तुटलेल्या अवस्थेत आहे. याचीही खालील दोन खोरणे नष्ट झाली आहेत. वरच्या खोरणातील मानवी आकृत्या स्पष्ट दिसत आहेत. शिवपिंडीचा भाग बराचसा तुटला आहे. उजव्या बाजूला पूजा करताना योध्याची आकृती तर डाव्या बाजूला स्त्री प्रतिमा दिसून येते. याचा अर्थ तो वीर सपत्नीक शिवपिंडीची पूजा करत आहे.  वरच्या बाजूला काळसाकृती उठावदार भाग आहे. हा विरगळही माथ्याकडे तिरकस तुटलेल्या अवस्थेत आहे. सोबतच्या छायाचित्रात आपण तो विरगळ पाहू शकतो.

एकूणच काय तर, कवठे सारख्या मोठ्या गावालाही असा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला असून सध्या तो दुर्लक्षित अवस्थेत आहे. गावात आणखीही काही विरगळ असू शकतात. विशेषतः मंदिरांच्या प्रांगणात, परिसरात असे विरगळ आढळून येण्याची दाट शक्यता आहे. गावातील मंदिरांची संख्या पाहता आणखी काही विरगळ आपल्याला आढळून आल्यास आश्चर्य नसावे. कवठ्यात जुन्या गावातील १८९८ साली बांधलेला यादव वाडा, नदिकाठचं प्राचीन शिवमंदिर, ग्रामदैवत श्री जोतिबा मंदिर यांसारख्या वास्तु अन मंदिरे आपला इतिहास समृद्ध वारसा आजही सांगत आहेत. यांच्या वास्तुरचनेचा शोध घेतला गेला पाहिजे. कोणीतरी जाणत्या इतिहासप्रेमीने त्यासंबंधाने कार्य करून गावातील हा ठेवा सर्वांसमोर आणायला हवा. 


- संतोष काशिद. ( मो. ९९२३९७५०५३ )

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट