नव्या भारताची ओळख..
नव्या भारताची ओळख..
सध्या राजकीय क्षितिजावर वादाचा पगडा इतका जबरदस्त पडला आहे की देशातील प्रत्येक गोष्टीवर अकारण वाद उकरून काढायचा चंगच काही लोकांनी बांधला आहे. दिल्लीमध्ये सध्याच्या संसदेच्या लगतच नव्या संसदेच्या उभारणीचे कार्य प्रगतीपथावर आहे. देशाची एकूणच राजकीय रचना पाहता त्याची सध्या गरजही आहे. सेंट्रल व्हीस्टा योजनेअंतर्गत ज्या इमारतीचं निर्माण होतेय त्यात सुमारे साडे आठशे संसद सदस्य बसू शकतील इतक्या क्षमतेची नव्या संसदेची इमारतही उभारली जात आहे. वादाचा कारण सध्या या इमारतीशी निगडित आहे. देशाचं मानचिन्ह असलेले अशोक स्तंभ हे शिल्प या इमारतीच्या दर्शनी भागावर उभारले गेले आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं अनावरणही केले. वादाचा मुद्दा इथून पुढे सुरू होते. देशाच्या या मानचिन्हाचा देशातील प्रत्येकाला अभिमान आहे. हे भारताच्या सार्वभौमत्वाचे एक प्रतीक म्हणूनही ओळखले जाते आणि गेली सात दशके ते आपल्या सार्वभौमत्वाची ग्वाही देत आहे.
अशोक स्तंभाचा इतिहास हा इसवीसन पूर्व २७३ पर्यंत मागे अर्थात सम्राट अशोकाच्या काळात जातो. कलिंग युद्धात झालेल्या नरसंहाराने सम्राट अशोक प्रचंड व्यथित झाला. त्याने सामर्थ्य आणि शांततेचे प्रतीक म्हणून चार सिंह असलेल्या शिल्पाची निर्मिती केली. हे चिन्ह एका उलट्या कमळ फुलावर स्थित असून कमळाच्या वर गोलाकार आसनही आहे. या गोलाकार आसनाच्या बाहेरच्या बाजूला घोडा, हत्ती, बैल आणि सिंहाच्या शिल्पाकृती कोरल्या आहेत. वर चारही दिशांकडे मुख असलेल्या चार सिंहांना दर्शवले गेले आहेत. अशोकाने असे अनेक स्तंभ निर्माण केले. त्यातीलच हा एक. १९०५ मध्ये पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सध्या आपण पाहत असलेला स्तंभ उत्तर प्रदेशातील सारनाथ मध्ये सापडला.
स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेची निर्मिती झाली. २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना अंमलात आली आणि याचेवळी देशाचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून अशोक स्तंभाचा स्वीकार केला गेला. याचा स्वीकार करताना मूळ स्तंभाच्या खाली असलेले उलटे कमळ वगळले गेले आणि प्राचीन 'मुंडकोपनिषद' या उपनिषादमध्ये असलेल्या 'सत्यमेव जयते नानृतम् सत्येन पन्था विततो देवयानः। येनाक्रमत् मनुष्यो ह्यात्मकामो यत्र तत् सत्यस्य परं निधानं॥' या अत्यंत सुंदर श्लोकातील 'सत्यमेव जयते' हे पहिले दोन शब्द राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून या चिन्हावर अंकित केले गेले. थोडक्यात या श्लोकाचा अर्थ असा की सत्य हे नेहमीच विजयी असते.सत्याचाच नेहमी विजय होतो.
आता नव्याने घडवलेल्या या शिल्पामुळे जो वाद निर्माण केला गेला आहे किंवा झाला आहे त्यामुळे देशातील एक वर्ग या शिल्पाकृतीविषयी प्रचंड व्यथित असल्याचे दिसत आहे. हे शिल्प औरंगाबादच्या सुनील देवरे या एका मराठी शिल्पकाराने निर्माण केलं आहे. देवरे हे स्वतः गेली तीस वर्षांहून अधिक काळ शिल्पा निर्मिती करत आहेत. आपल्याला राम सुतार, करमरकर, खानविलकर आशा काही मोठ्या शिल्पकारांचा वारसा लाभला आहे. देवरे हेही मोठ्या शिल्पनिर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.. शिल्पनिर्मितीचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. संसदेवर उभारलेलं हे शिल्प त्यांच्या शिल्पचमूने जवळपास नऊ महिन्यांच्या अथक प्रयत्नाने निर्मित झाले आहे. तब्बल साडे नऊ टन वजन असलेलं हे शिल्प शिल्पनिर्मितीच्या आठ वेगवेगळ्या टप्प्यांमधून निर्माण झाले आहे. जिथे हे शिल्प स्थापन करण्याचे नियोजन होते त्या संसदेच्या इमारतीवर स्थापन करताना इतक्या मोठ्या क्रेनची अनुपलब्धता पाहून त्याचे वेगवेगळे भाग केले गेले. ते वर जोडले गेले.
याबाबत सध्या होत असलेल्या वादामध्ये काही मुद्दे प्रकर्षाने मांडले गेले आहेत. त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे हे शिल्प मूळ शिल्पबरहुकूम नाही. त्याच्या मूळ रचनेत अनेक फेरफार केले गेल्यामुळे राष्ट्रीय मानचिन्हाचा अपमान झाला. मूळ शिल्परचनेतील सिंह शांत स्वभावाचे आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर हिंसक भाव नाहीत मात्र नव्या शिल्पात दर्शवलेले सिंह हिंस्र वाटतात. त्यांच्या स्वभावात आक्रमकता दर्शवते. मूळ शिल्पावर खाली असलेल्या गोलाकार असनाभोवती कोरले गेलेले इतर प्राणी प्राण्यांच्या शरीररचनेचा अभ्यास करून बनवले गेले आहेत मात्र नव्या शिल्परचनेत हे प्राणी जाडे भरडे दाखवले आहेत. आणखीही काही मुद्दे शिल्पशास्त्रातील अभ्यासकांनी उपस्थित केले आहेत.
यावर साधक बाधक चर्चा होईलच. अनेक तज्ञ मंडळी आपापले अभिप्राय सरकारपर्यंत पोहोचवतील मात्र सध्या त्यापेक्षाही अधिक गरजेचे आहे ते 'सिंहावलोकन'. वास्तविक, चर्चेची इतकी राळ उठली असताना हे सिंहावलोकन कशासाठी हा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण होईल मात्र त्याची गरज आहे. सिंहाच्या मूळ स्वभावगुणधर्मात एक विलक्षण बाब आढळते ती म्हणजे सिंहाचे 'सिंहावलोकन'. एका ठराविक अंतरात मार्गक्रमण केल्यावर सिंह आपल्या मार्गाचं, कार्याचं अवलोकन करून पुढच्या आणखी मजबूत तयारीला लागतो. त्याच्या या सिंहावलोकनात असंख्य गोष्टी लक्षात येतात. त्याच्या लक्षात येत असते की आपण नक्की किती पुढे आलो आहोत.
जंगलाचा राजा असलेला सिंह वास्तविक अत्यंत सुस्त, आळशी प्राणी. तो सहजी कोणाच्या वाट्याला जात नाही मात्र त्याच्या मार्गात येणाऱ्या सर्वांचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाही हेही तेवढेच सत्य. सिंहाचं स्वतःचं वेगळेपण हे त्यांच्या भारदस्त देहयष्टीत आहे. त्याला शांत संयमी केला तर त्यांच्यातलं 'राजेपण' टिकून कसे राहील हा प्रश्न आहेच. सुरुवातीच्या काळात जेव्हा हे शिल्प स्वीकारलं गेलं तेव्हाच्या राजकीय धुरीणांच्या विचार प्रणाली नुसार मूळ सिंहशिल्प आणखी सौम्यतेने स्वीकारले गेले. नेहरूंच्या पंचशील तत्वांचा त्यात चेहरा दिसतो. कागदावर रेखाटताना ते शिल्प अन पर्यायाने सिंहसुद्धा सोशिक स्वरूपात रेखाटलं गेले जे वास्तविक तसे नव्हते.
आज देशाला गरज आहे ती या सिंहावलोकनाची. चौफेर प्रगती करणाऱ्या भारताने खरेतर स्वातंत्र्यानंतर केलेला विकास अपेक्षित गतीपेक्षाही फार कमी आहे. आपल्या समवसमयस्क असलेल्या जपानसारख्या देशाने स्वतःस आधुनिक करून घेतले, सिंगापूरने क्रमांक पटकावला पण आपण मात्र अजूनही मूलभूत गोष्टींसाठी धपडतोय. आर्थिक संपन्नतेचे चौफेर वादळ असलेला आपला देश ज्या गतीने पुढे जाणं गरजेचे होते तसा तो गेला नाही हे वास्तव आहे. सरकारे आली गेली मात्र सर्वसामान्य लोकांच्या जीवनात ज्या वेगाने बदल अपेक्षित होता तो झाला नाही. हे शिल्प निमित्तमात्र. विरोधकांना विरोध करण्यास कोणतेही क्षुल्लक करण पुरेसं आहे. हे शिल्प साकारणाऱ्या शिल्पकार सुनील देवरे यांची मुलाखत बीबीसी वाहिनेने घेतली. त्यात देवरेंनी सध्या होत असलेल्या वादावर स्पष्टीकरण देऊन हा वाद कसा निरर्थक आहे हे स्पष्ट केले आहे.
आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे देशाने आणखी किती वर्षे स्वतःला एक सोशिक राष्ट्र म्हणून जगासमोर उभे करायचे.आता ही प्रतिमा बदलायला हवीच की. वास्तविक ही आपली ही सोशिक वगैरे प्रतिमा मागच्या कित्येक वर्षांपूर्वीच बदलणे गरजेची होती. मात्र सतत गळचेपी भूमिका घेऊन सरकारे स्वतःला उगाचच शांततेचा दूत म्हणवून घेऊ लागल्याने इथे आतंकवाद बोकाळला. सहन करतोय म्हणून हल्ले करा ही हल्लेखोरांची मानसिकता तयार झाली अन त्याचाच परिणाम म्हणून साध्याचू देशांतर्गत असलेली एक विशिष्ट अशांतता आहे. हा नवा भारत आहे. या भारताने 'अरे ला कारे..'करणारी भूमिका घेतली तरच जागतिक पातळीवर देशाच्या धोरणांना जागा मिळेल अन्यथा परावलंबित्व पूर्वीही होते अन पुढेही राहीलच. अशोक स्तंभाचं शिल्प हे या नव्या भारताचे दर्शनी प्रतीक आहे. येणाऱ्या पिढ्यांनाच नव्हे तर अखंड विश्वाला ते या नव्या भारताची नवी ओळख करून देईल हे नक्की.... जय हिंद.
- संतोष काशीद (मो.९९२३९७५०५३)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा