आठवणींतील गाठीभेटी....

 गाठीभेटी....


शालेय जीवन संपून आता बराचसा काळ लोटला. या दरम्यान अवघं जग बदललं, विचारांच्या पातळीने असंख्य आवर्तने घेतली, प्रत्येकाचं जग एका विशिष्ट वर्तुळात बंदिस्त झाले, हे असं कोशबद्ध होता होता स्वतःतलं बालपण विस्मृतीत गेले. अर्थात काळानुरूप ते गरजेचंही होतं पण तरीही प्रत्येकात दडलेलं एक बालमन फिरून पुन्हा पुन्हा स्वतःला नव्याने त्याच वळणावर घेऊन जाते. शालेय जीवनातील आम्ही बालमित्र, मैत्रिणी ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग यात्रेनिमित्ताने असेच बालपणाच्या रम्य आठवणींमध्ये हरवून गेलो. आठवणी किती मोहक आहेत हे महत्वाचे तर आहेच पण यापेक्षा आज त्या आठवणींचं मूल्य किती महाग आहे हे यानिमित्ताने पुन्हा लक्षात आले. आज कितीही किंमत मोजली तरी पुन्हा ती वेळ, तो काळ आपण जगू शकत नाही हे जाणवले. 


यात्रेनिमित्ताने माझ्या वर्गमैत्रिणींपैकी सारिका, पुष्पलता, आशा, रेश्मा यांची फार वर्षांनी भेट झाली. मित्रांपैकी प्रदीप गायकवाड, प्रदीप साळुंखे, योगेश, दत्ता, अमोल, नवनाथ, प्रमोद यांची भेट झाली. आम्ही मुले नेहमीच एकमेकांना भेटत असतो मात्र मुली आपापल्या संसारात इतक्या गुरफटलेल्या असतात की त्यांच्यासाठी या गाठीभेटी काहीशा अशक्य होतात. मुळात सामाजिक जीवनात वावरताना आपल्याला मित्रमंडळींचे सहकार्य लाभल्यामुळे जीवन सुकर होते हे सत्य नाकारता येत नाही. कारण, पैसा, संपत्ती या जीवणरुपी वृक्षाची फळे असतात तर कुटुंबीय, मित्र मंडळी ही या वृक्षांची मुळे असतात. मानवी आयुष्याचा हा जीवनवृक्ष एकवेळ फळांशीवाय तग धरू शकेल पण त्याची मुळं ही त्याच्या सामर्थ्याची प्रतीके असतात. त्यांचं असणं हे त्या वृक्षाच्या जिवंतपणाचं लक्षण असतं. मित्रमंडळी आयुष्यात महत्वाची असतात ते यासाठीच. 


या छोट्याशा मेळाव्यात गतकाळातील असंख्य आठवणी नव्याने उजागर झाल्या. प्रत्येकाने स्वतःचे संस्मरणीय अनुभव मांडले. हायस्कुलमध्ये पूर्वी एकत्र खो-खो वगैरे खेळ खेळले जात असत. त्यात झालेले धम्माल किस्से ऐकून पोटभर हसलो. प्राथमिक शाळेत असताना गैरहजर विद्यार्थ्याला घेऊन ये म्हटल्यावर आमची विद्यार्थी सेना कशी बेदरकारपणे त्या विद्यार्थ्याला अक्षरशः उचलून आणत असे हे ऐकताना हसून पुरेवाट झाली. शिक्षकांचा खाल्लेला मार तर अजूनही चांगला आठवतो. कधीतरी शाळेला दांडी मारून नदीला पोहायला जाण्याचे किस्सेही तितकेच मजेदार. 

आम्हा मुलांपेक्षा वर्गातील मुली अधिक समंजस होत्या. स्काऊट गाईड शिबीर असताना आम्हाला जेवण बनवता येत नाही म्हणून पुष्पलता, सारिका, रेश्मा, आशा अन बाकीच्याही मुली स्वतः धावून आल्या अन पोरींनी न कुरकुरता आमच्या चुलीचा ताबा घेतला. त्याबदल्यात आम्ही त्यांचे शिबिराचे तंबू बांधायला मदत केली. शाळेतला गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, वार्षिक स्नेहसंमेलन आशा कितीतरी आठवणी डोळ्यांसमोर जशाच्या तशा उभ्या राहिल्या. खरे म्हणजे आम्ही सगळेच मनाने एकमेकांत गुंतलो होतो. त्यामुळे अजूनही त्या बाल आठवणी निघाल्या की आम्ही लहान होऊन जातो. आज सगळेच आपापल्या आयुष्याच्या परिघात बंदिस्त आहेत, अडकले आहेत, मानवी स्वभावधर्माला अनुसरून कुटुंब कबिल्यात हरवून गेलेत पण, त्यातूनही असा सुवर्णयोग आला की आम्ही पुन्हा ते दिवस मनसोक्त जगतो, अनुभवतो. 

कितीतरी आठवणी आजही मनाच्या गाभाऱ्यात ताज्या आहेत.  अनेक नाजूक, हळवे क्षण फुलासारखे जपून ठेवलेत, त्यांचं ताजेपण अजूनही तेवढेच सुंदर आहे, कोमल आहे, हवंहवंसं वाटणारं आहे. 'बालपण दे गा देवा...' असंम्हणतात ते उगीच नाही. आठवणींचे ऋणानुबंध आजन्म हृदयी वास करतात. या आठवणी माणसाला जिवंत ठेवतात, आयुष्याचं संचित म्हणजे तरी दुसरं काय असतं. अशा भेटीगाठी आपल्यातील ऊर्जेचा स्रोत असतात. म्हणूनच ऊर्जेची ही उगमस्थाने वारंवार जागती ठेवायला हवीत.... ऋणानुबंधाच्या या गाठीभेटी जपायलाच हव्यात...

- संतोष

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट