गोमंतकीय श्रीगणेश

गोमंतकीय श्रीगणेश... 

राष्ट्राच्या सामाजिक उभारणीतील सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे उत्सव. भारत तर उत्सवांचे माहेरघर. इथे असंख्य जाती धर्माचे, पंथाचे लोक आपापल्या चालीरीती, प्रथापरंपरा गेली हजारो वर्षे अव्याहतपणे जपत आहेत. अनेक उत्सवांचे इथले देखणेपण जगाला हेवा वाटावा इतके विलोभनीय, दिमाखदार, भव्यदिव्य, अन वैभवशाली आहे. गणेशोत्सव हा या उत्सवांमधील उल्लेखाने नाव घ्यावा असा उत्सव. १८९२ नंतर गणेशोत्सवाचे सर्वत्रिकरण झाले. तत्पूर्वी तो काही मोजक्या लोकांच्या घरीच साजरा केला जात असे. पुण्यातील पेशव्यांच्या शनिवारवाड्यात असलेल्या मुख्य सभागृहास 'गणेशमहाल' असे नाव होते यावरून गणेशोत्सव उच्चवर्गीयांमध्ये रुळला होता हे नक्की. अगदी शिवकाळातही गणेशपूजनाचे उल्लेख आहेत तर छ. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या बहुतेक सर्वच गडकोटांवर गणेश प्रतिमा दिसून येतात.

दै. गोवन वार्ता रविवार दि. २८ ऑगस्ट २०२२. 
गणेश चतुर्थी विशेष पुरवणी

निळ्याशार सिंधुसागराच्या कुशीत वसलेल्या रुपसंपन्न चिमुकल्या गोव्यातही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. गोव्यात यास 'चवथ' म्हणतात. इथल्या ग्रामीण संस्कृतीत खास गोमंतकीय पद्धतीची घरे श्रीगणेशाच्या आगमनासाठी अगदी कुशलतेने सजलेली असतात. या प्रत्येक घरात गणेशपूजनाची राखीव जागा असते. इथे दीड दिवसांपासून ते अगदी अकरा दिवसांपर्यंत गणेशाची आराधना केली जाते. परंपरेनुसार पूजाविधी करणारी अनेक कुटुंबे, सार्वजनिक मंडळे गोव्यातील गणेशोत्सव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात. घुमटाच्या कडक पण मधुर आवाजाच्या पार्श्वभूमीवर इथल्या गणेशाची होणारी आरती हे महाराष्ट्र किंवा इतर प्रांतापेक्षा एका वेगळ्याच सुरात म्हटली जाते. दोन्ही बाजूंनी उघडे असलेल्या मातीच्या घड्याला एका बाजूने घोरपडीचे चर्म लावून बंद करतात. यावर दिलेला ठेक्याचा सूर अगदी दूरपर्यंत ऐकू येतो. अवघा परिसर या आवाजाने भक्तिरसात न्हाऊन निघतो. त्यामुळे गोमंतकीय गणेशोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य अशी ओळखही घुमट वादनास मिळाली आहे. अनेक ठिकाणी घुमट वादन स्पर्धाही यानिमित्ताने आयोजित केल्या जातात. 

कोकणप्रांतातील गणेशोत्सवाची आणखी एक वेगळेपण दर्शवणारी बाब म्हणजे श्री विनायकाच्या स्थापनास्थळी डोक्यावर केलेली माटोळी आरास. माटोळीसाठी खास लाकडी फ्रेमची व्यवस्था प्रत्येकाने केलेली असते. निसर्गातील वेगवेगळ्या फुलांची, पानांची कलात्मक रचना करून ही माटोळी सजवली जाते. हे वैशिष्ट्य केवळ गोवा अन कोकण प्रांतातच पाहायला मिळते. गोमंतकीय स्त्री जीवनात या माटोळीचं महत्व विशेषत्वानं यासाठी की संतती प्राप्तीसाठी स्त्रीने बोललेला नवस पूर्णत्वास गेला तर होणारे नवजात मूल शुभ्र कपड्यात गुंडाळून माटोळीस बांधण्याची एक जुनी प्रथा आहे. कालानुरूप यात बदल झालाही असेल पण तरीही इथल्या गणेशोत्सवाचं हे वेगळेपण लक्षणीय आहे. नवसाच्या बोलीमध्ये बोलला जाणारा 'लाडवाचं पेडं' प्रकारही असाच काहीसा वेगळा. पेडं म्हणजे पार. नवस फळला की एकावर एक लाडवाचा थर लावून श्रीगणेशाभोवती असा पार बांधला जातो. इतर कोणत्याही प्रांतात सुपात पेटता दिवा ठेवणे हे अशुभ मानले जाते मात्र गोमंतकात ही प्रथा गौरी विसर्जनाच्या वेळी पाळली जाते. हेही इथले वैशिष्ट्य. 

गोव्यातील गणेशोत्सव हा इतर प्रांतांपेक्षा थोडासा वेगळा वाटतो. कोणत्याही नव्या घरी श्रीगणेश मूर्ती स्थापन करायची असेल तर तो स्वतः त्या घरातील सदस्याने आणायचा नसतो ही इथली प्रथा. अशावेळी शेजाऱ्यांनी भल्या पहाटे गणेशमूर्ती नव्या घराच्या चौकटीत आणून ठेवली जाते.तदनंतर यजमानांकडून विधिवत ती घरात घेऊन तीची स्थापना केली जाते. नवगणेशाची अशी सुरुवात कदाचित फक्त गोव्यातच असावी. गोव्यात काही जुनी गणेशमंदिरेही इथल्या गाणपत्य आराधानेची साक्ष देत आहेत. माशेलजवळ असलेले खांडोळे येथील श्रीगणपती मंदिर हे त्यापैकीच एक. पोर्तुगीज शासन काळात गोव्यातील मंदिरांचा जो विनाश झाला त्याची यादी पिसुर्लेकर आपल्या ग्रंथात देतात. तिसवाडीच्या येळामधील श्रीगणेश मंदिरही या यादीत येते. ख्रिस्तीकरणात हे देवालय प्रथम दिवाडीजवळ असलेल्या नावेलीत स्थलांतरित झाले. १५६० साली तिथून हे देवालय खांडेपार इथे तर पुढे सावंत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या डिचोली जवळील नार्वे इथे विसावले. १७८१ मध्ये पोर्तुगीजांनी डिचोली ताब्यात घेतल्यावर हे देवस्थान महाजनांनी खांडोळे येथे कायमचे स्थापन झाले. विशेष म्हणजे यावेळी पोर्तुगीजांनी हिंदू धार्मिक परंपरा, मंदिरांना धक्का न लावण्याचे आश्वासन दिले होते. तसा जाहिरनामाही त्यांनी काढला होता. मात्र तरीही पूर्वानुभव लक्षात घेऊन मंदिरांची स्थलांतरे होत राहिली. 

गोव्यातील गणेशाच्या प्राचिनत्वाचे असंख्य पुरावे राज्यभर पसरलेले आहेत बरेचसे संग्रहालयांमध्ये आहेत तर काही गोव्याच्याही बाहेर आहेत. त्यातल्या काही लक्षणीय उल्लेखांचा लेखाजोखा यानिमित्ताने महत्वाचा ठरतो. १९३० च्या सुमारास पुरातत्वज्ञ हेरास यांच्या नेतृत्वात पुरातत्व खात्याने दिवाडीच्या टेकडीवर असलेल्या नोसा पिदादे चर्चच्या शेजारील स्मशानभूमीत उत्खनन केले. यावेळी या स्मशानभूमीत त्यांना एका पूर्ण गणेश मंदिराचे अवशेष सापडले. इथे सापडलेले पाषाणी नक्षीदार स्तंभ हे या देवालयाच्या सुंदरतेची साक्ष देत होते. यावेळी इथे एक पाषाणी भव्य कमलपुष्पही सापडले होते. डॉ. गुणे यांनी अनसियंट श्राइन्स ऑफ गोवा या ग्रंथात याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. हे चर्च १५४७ मध्ये बांधले. अर्थात ते इथल्या मूळ मंदिराचा विध्वंस करून बांधले हे स्पष्ट आहे. रिवण येथेही प्राचीन गणेशमूर्ती सापडल्याचे पुरातत्व खात्याच्या नोंदींवरून लक्षात येते. गोव्यातील गणेश आराधना स्थळांची माहिती घेताना त्याचे प्राचीनत्व विशेषत्वाने दिसून येते. 

मडगावमधील प्रसिद्ध होली स्पिरिट चर्च १५६५ मध्ये बांधली गेली. पोर्तुगीज शासनकाळात १८२८ मध्ये या चर्चचा विस्तार करताना मागील बाजूस खोदकामात तेथील धर्मगुरूंना काही पाषाणी शिल्पे मिळाली. त्यात वेताळसदृश एक मूर्ती मिळाली तर दुसरी मूर्ती ही गणेशमूर्ती होती. ही सुंदर, नाजूक मूर्ती भग्न होती, मात्र तरीही ती पुरातत्वदृष्ट्या महत्वाची होती. हेरास यांनी हे मूर्तीशिल्प आपल्याला भेट मिळाल्याचे सांगून मुंबईला नेले. सध्या हे भग्न गणेश शिल्प मुंबईच्या हेरास इन्स्टिट्यूटमध्ये आहे. श्रीगणेशाची आणखी एक सुंदर मूर्ती पुरातत्व खात्याला सध्याच्या पिलार सेमिनारीच्या संरक्षक भिंतीच्या बाहेरच्या बाजूला मिळाली. ही मूर्ती आठव्या शतकातील असून यावेळी गोव्यावर राष्ट्रकुटांचे मांडलिक म्हणून काम करत असलेल्या शिलाहारांचं राज्य होते. ही गणेशमूर्ती भग्न असली तरीही मूर्तीची काही अनोखी वैशिष्ट्ये आहेत. महत्वाचे म्हणजे या मूर्तीच्या डोक्यावर कमलदले आहेत. तर गळ्यात सुंदर माळ, खांद्यावरून पोटावर रुळलेले जाणवे अशा काही शिल्पाकृत्याही मूर्तिवर दिसून येतात. 

पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. ए. सुंदर यांच्यामते ही मूर्ती घृष्णेश्वर महादेव मंदिरातील द्विभुजधारी गणेशमूर्तीशी साम्य दर्शवते. तसेच साधर्म्य बांदोड्याच्या मंदिरातील मूर्तीशीही दर्शवते. डॉ. ब्रागांझ परेरा यांना साठच्या दशकात पिलारजवळ नाथसांप्रदायीक गुहा असल्याचे पिलारचे फ्रान्सिस दिनीझ यांनी माहिती दिली. पुढे ही गुहा १९६२ मध्ये मुजवली गेली. इथे हे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे या गुहेच्या डाव्या बाजूस गणेशमूर्ती कोरली होती. फातर्पे ते बोंडला या पट्टयात तब्बल २४ गणेशस्थळे असल्याची नोंद आहे. तसेच साळावलीमधील एका भग्न मंदिरात एक बालगणेश सापडला तो सध्या राज्य वस्तुसंग्रहालयमध्ये असल्याचे 'शतकातील गोमंतक' मध्ये शिरोडकर म्हणतात. बालगणेशाच्या प्राचीन मूर्त्यांपैकी पहिली अफगाणिस्थानमध्ये असून दुसरी लखनौ तर तिसरी गोव्यात असल्याचेही ते नमूद करतात. हे गोव्यासाठी भूषणावह नक्कीचं आहे. 

एकूणच या सर्वांचा मतितार्थ इतकाच की गणेश आराधनेची गोव्यातील परंपरा अत्यंत प्राचीन आहे. इथल्या सांस्कृतिक इतिहासात गणेश आराध्य आहे. समस्त गोवेकर श्रीगणेशाची आराधना प्राचीन काळापासून करत आले आहेत. पोर्तुगीजांच्या क्रूर शासनकाळात विशेषतः गोवा इंक्विझिशनच्या अन्यायी काळातही इथल्या धर्मांतरित हिंदूंनी पोर्तुगीज सरकारच्या डोळ्यांआड का होईना पण श्री मंगलमूर्तीच्या पूजेचा नित्यनियम सांभाळून ठेवला होता. अत्यंत धामधुमीच्या काळात चाणाक्ष महाजनांनी देवालयांतील मूर्ती सुरक्षित हलवल्या असतील त्यामुळेच सध्या आपल्याला या शिवनंदनाची मंदिरे पाहायला मिळत आहेत. गोव्याच्या संस्कृती, प्रकृती ही गणेश आराधानेची आद्यकाळापासून वहन करणारी संस्कृती म्हणून ओळखली जाते. समस्त गणेशभक्तांना गोमंतकीय इतिहासातील गणेश आराधनेच्या खाणाखुणा नक्की माहीत असाव्यात. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा..... 

- संतोष काशीद

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट