गोमंतकातील पुरातत्वीय वास्तुवैभव - तांबडी सुर्ला शिवमंदिर.

गोमंतकातील पुरातत्वीय वास्तुवैभव - तांबडी सुर्ला शिवमंदिर. 


देवभूमी गोमंतकात प्राचिनत्वाच्या कथा सांगणारे असंख्य धागेदोरे इतस्ततः विखुरले आहेत. पुरातत्व शास्त्राच्या दृष्टीने गोवा विशेष समृद्ध आहे कारण इथे नांदलेल्या सत्तांनी आपापल्या अस्तित्वाच्या असंख्य खाणाखुणा मागे सोडल्या आहेत. कदंब सत्ता, मोगल सत्ता, विजयनगर तसेच प्रदिर्घकाळ चाललेली पोर्तुगीज सत्ता इथल्या सामाजिक जीवनाला ढवळून गेल्या आहेत. इथे भव्यदिव्य मंदिरांची रेलचेल आहे तर दुसरीकडे आकाशाला भिडणाऱ्या चर्चही आहेत. एकीकडे सागरी सौंदर्याची सोनेरी किनार आहे तर दुसरीकडे बेलाग पर्वत कड्यांनी गच्च भरलेला प्रदेशही आहे. इवल्याशा गोव्यात विविधतेची अशी रंगबिरंगी उधळण असल्याने अवघ्या जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून त्याची ओळख झाली आहे. गोव्यातील विशेष उल्लेखनीय म्हणून ज्याचा उल्लेख करावा ते म्हणजे इथली वनराजी. पश्चिम घाटाचा बराचसा भाग गोव्याला व्यापतो. हिरव्याकंच वृक्षराजीने बहरलेले इथले डोंगरकडे पाहिले की दिवसा धडकी भरावी इतके गूढवलय त्यात भरलेले. त्यामुळेच इथल्या निसर्ग सौंदर्याची मोहिनी प्रत्येकाला पडते. महादेवाने जटासांभार सोडून बेभान तांडवनृत्य करावे तसा इथला उफानलेला पर्जन्य भल्याभल्यांची त्रेधा उडवतो. असंख्य देवादिकांनी या वृक्षराजीमध्ये आपल्या देवत्वाची महत्ता स्थापिली आहे. जिथे देवांनाही या भूमीचा मोह पडला तिथे आपल्यासारख्या यःकश्चित मनुष्यप्राण्याची कथा ती काय. हिरव्या गर्द वनराजीत वसलेले, प्रचिनत्वाचा पाषाणी, शिल्पशात्रीय वारसा सांगणारे अन गोमंतकीय संस्कृतीचे गोडवे गाणारे सांगे तालुक्यातील तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर म्हणजे या भूमीला पडलेले सुंदर स्वप्नच. 


निसर्गरम्य 'वझराचो व्हाळ' च्या डाव्या काठावर वसलेले हे प्राचीन शिवालय सातशे वर्षांचा लिखित इतिहास आपल्या अंगाखांद्यावर लेवून दिमाखात उभे आहे. त्याची वयोमर्यादा नेमकी किती याबाबत अभ्यासकांमध्ये आजही मतभेद जरूर आहेत. मात्र तरीही बाराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत त्याच्या इतिहासाची पाळेमुळे शोधण्यात संशोधकांना, पुरातत्व खात्याला यश आले आहे. यादवकाळात हेमाद्रीपंताने याची उभारणी केली असे म्हणतात. तर कदंबांनी मंदिराकडे विशेष लक्ष दिले होते. यादव-कदंब काळातील हे गोमंतकातील एकमेव शिल्लक मंदिर असावे कारण या स्थापत्याशी साधर्म्य सांगणारे मंदिर गोव्यात आढळत नाही. मंदिर मोलें प्रभागातील भगवान महावीर अभयारण्यात असल्यामुळे इकडे वनखात्याची बारीक नजर असते. मंदिराचे मूळ शोधताना गोमंतकीय मंदिर स्थापत्याचा अभ्यास ग्रंथांमध्ये मांडणाऱ्या असंख्य ग्रंथांचा आधार तर घ्यावा लागतोच शिवाय पुरातत्व खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीचाही आधार महत्वाचा ठरतो. 'टेम्पल्स ऑफ गोवा-आर्किटेक्चरल स्टडी' या ग्रंथात ज्येष्ठ पुरातत्वज्ञ श्री गोपाळ राव हे म्हणतात की कदाचित हे मंदिर कदंब कुळातील पद्मा देवीच्या काळात बांधलेले असावे. 


हे मंदिर स्थानिकांना माहीत असावे मात्र कागदोपत्री, शासनदरबारी त्याची नोंद झाली ती १९३५ मध्ये. पोर्तुगीज अंमलाखालील तत्कालीन गोवा सरकारच्या खात्यात जमीन सर्व्हे विभागात कार्यरत असलेल्या अनंत रामकृष्ण धुमे यांनी सर्वप्रथम या मंदिराची माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.पी.एस. पिसुर्लेकर यांना दिली. पिसुर्लेकर त्यावेळी गोवा सरकारच्या पुराभिलेख खात्यात अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत होते. पिसुर्लेकरांना इतिहासविषय प्रचंड अनुभव, तळमळ असल्याने त्यांनी मंदिराची पुरातत्वीय वास्तू म्हणून सरकारी दफ़्तरात नोंद केली. मंदिराची प्राचीनता, स्थापत्य आदी बाबी तपासून भारतीय पुरातत्व खात्याने त्याचा समावेश राष्ट्रीय वारसास्थळ यादीत केला. आज जरी मंदिराची नोंद १९३५ मधील असली तरी मुंबई येथील सेंट झेवियर कॉलेजचे संशोधक आणि गोमंतकीय पुरातत्व विषयावर अभ्यास करणारे अभ्यासक फादर हेन्री हेरास हे १९२८-२९ च्या दरम्यान पुरातत्वीय अभ्यासासाठी गोव्यात आले. त्यांच्या काळात तांबडी सुर्ला मंदिराकडे जाण्यास रस्त्याची सोय नव्हती त्यामुळे ते तिकडे जाऊ शकले नाहीत मात्र त्यांना या मंदिराविषयी माहिती होती असे गोवा पुरातत्व खात्याचे माजी संचालक डॉ.प्रकाशचंद्र शिरोडकर आपल्या 'शतकातील गोमंतक' या ग्रंथात आवर्जून उल्लेख करतात. अर्थात मंदिराची अधिकृत दाखल घेण्यापूर्वीही हे मंदिर बऱ्याच लोकांना, अभ्यासकांना ज्ञात होते मात्र कदाचित पोर्तुगीज शासन काळात त्याच्या नोंदी करावयास कोणी धजावले नसावे. 


हे मंदिर सुर्ला गावात असल्याने तसेच हा संपूर्ण परिसर लाल तांबड्या मातीचा असल्याने या मंदिराला तांबडी सुर्ला महादेव मंदिर असे संबोधले जाते. मंदिर पूर्वाभिमुख आहे. अपवाद वगळता उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये मंदिर वर्षभर अक्षरशः न्हाऊन गेलेले असते. सुर्यभास्कराच्या शीतल किरणांनी प्रसन्न झालेला हा मंदिर परिसर अनुभवने म्हणजे एक विलक्षण अनुभव असतो. मंदिरासमोर असलेली सुरला नदी त्याच्या सौंदर्यात भर घालतो. तर समोरचा भव्य पहाड मंदिराच्या प्रचिनत्वाची साक्ष देतो. संपूर्ण मंदिर हिंदू मंदिरांच्या प्रचलीत रचनेशी साधर्म्य दर्शवणारे आहे आणि ते सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह आशा एकूण तीन भागात उभारले आहे. सभामंडपात एक भग्न नंदी असल्याने यास नंदीमंडप असेही म्हटले जाते. सभामंडपाच्या प्रवेशद्वारातून शिवलिंगाचे दर्शन होत असल्याने यास मुखमंडप असेही संबोधले जाते. अर्धा पुरुष उंचीच्या देखण्या पाषाणी जोत्यावर हे संपूर्ण मंदिर उभारले गेले असून सभामंडपाच्या तीनही बाजूंनी मंदिरात प्रवेशनारा सुंदर दगडी पायरीमार्ग आहे. जोत्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कोरलेली दगडी शृंखला. वास्तवातील एखाद्या लोहशृंखलेलाही लाजवेल अशी सुंदर पाषाणी शृंखला या जोत्याच्या उजव्या बाजूला आहे. त्रिस्तरीय बांधणीच्या या जोत्याच्या मध्यावर नक्काशिदार पुष्परचना उठवली असून या पुष्पमाळेने अवघ्या सभामंडपाला (नंदीमंडप) कवेत घेतले आहे. 


सभामंडप आटोपशीर आहे. त्याचे छत तीनही बाजूला उतरते आहे. अखंड पाषाणी मजबूत शिलाखंडांनी संपुर्ण छत घडले आहे. १९३५ मध्ये ज्यावेळी हे मंदिर प्रथम निदर्शनास आले त्यावेळी हे छत इतस्ततः विखुरले होते. यांच्या अवजड पाषाणी शिळा निसटून आजूबाजूला पडल्या होत्या. पावसाच्या माऱ्याने संपूर्ण सभागृह मोडकळीस आले होते. मात्र भारतीय पुरातत्व खात्याने या शिळा सिमेंटमध्ये मूळ स्थानी बसवून घेतल्या. सध्या दिसत असलेले सभामंडपाचे छत हे त्यावेळी डागडुजी केलेलेच आहे. विखुरलेल्या शिळांचे एक छायाचित्र पुरातत्व खात्याच्या वेबसाईटवत पहायला मिळते. संपूर्ण सभामंडप दहा मजबूत स्तंभांवर विसावला असून त्यापैकी शिल्पशास्त्रातील अत्युच्च शिल्पकाम दर्शविणारे सभामंडपातील चार एकपाषाणी नक्षीदार स्तंभ इथे येणाऱ्या प्रत्येकाला नजरबंद करतात. या चारही स्तंभांवर चौरसाकृती पाया, अष्टकोनी आणि वर्तुळाकृती तबक अशी सुबक शिल्परचना केली आहे. स्तंभावर असलेल्या अष्टकोनी तबकावर पाय दुमडून बसलेली हनुमानसदृश्य आकृती दिसून येते. हे स्तंभ पाहताना प्रत्येकजण अक्षरशः स्तंभित होऊन जातो इतक्या कलात्मकतेने शिल्पकारांनी त्यांना घडवले आहे. आजच्या आधुनिक युगात जिथे अत्याधुनिक अवजारे उपलब्ध असतानाही अशी कलाकृती निर्माण होणे अशक्य आहे तिथे आठशे वर्षांपूर्वी मात्र शिल्पकारांच्या हातामध्ये साक्षात विश्वकर्मा वसत असल्याची प्रचिती येते. यातील एका स्तंभावर कदंब राजसत्तेचे प्रतिक असलेल्या हत्तीने एका अश्वाला पायदळी घेतल्याचे विशेष शिल्प आहे. हे शिल्पविशेष यासाठी की असे हे गोव्यातील एकमेव शिल्प आहे ज्यात गजराजाने केलेले अश्वमर्दन दर्शवले गेले आहे. गोव्यात कदंब सत्ता किती समर्थ आणि बलवान होती याचेच हे एकप्रकारे प्रतीक म्हणावे लागेल. शिल्प अत्यंत भारदस्त आहे. प्रचंड ताकतवर हत्तीच्या पाठीवर एक स्वार विराजमान असून त्याच्या हाती शस्त्र आहे. शेपूट हवेत उडवत चित्कार करणारा हा गजराज अत्यंत क्रुद्ध दिसत आहे. आपल्या बलदंड पायाखाली याने एक अश्व अक्षरशः लोळवला आहे. क्रुद्ध होताना हत्तीच्या चेहऱ्यावर दर्शवलेला भाव शिल्पकारांच्या शिल्पकलेची महारथ दर्शवतो. सभामंडपाच्या चारही रेखीव स्तंभांवर नागराज विळखा घालून बसले असल्याचे शिल्प स्तंभावर आहे. 
सभामंडपातील आखीव रेखीव पाषाणी स्तंभाच्या मध्यावर एका भव्य गोलाकार आसनावर स्थित एक तेवढाच भव्य नंदी आहे. दुर्दैवाने कोण्या निष्ठुर राजसत्तेच्या क्रूर घावांनी नंदीचं शीर वेगळे केले. हा भग्न झालेला नंदी वर्षानुवर्षे त्याच्या पुनरुत्थानाची वाट पाहत एका फूटभर उंचीच्या आसनावर तिष्ठत बसला आहे. पुष्ट बांधणीचा हा नंदी सभामंडपाच्या प्राकाराला शोभेल असा आहे. नंदीच्या गळ्यात अत्यंत सुंदर असा पाषाणात घडवलेला साखळदंड आहे. महादेवाचं वाहन म्हणून पुराणशास्त्र नंदीच्या महत्वाला अधोरेखीत करते. धन्याकडे दृष्टी असलेला हा महादेवाचा आजन्म सेवक असा भग्नावस्थेत पाहून मन उद्विग्न होते हे निश्चित. या मंदिरातील सर्वाधिक सुंदर शिल्प म्हणजे छताला असलेल्या वितानातील अष्टकमलदल स्वरूपातील देखणे पाषाणी झुंबर. श्री गोपाळ राव यांच्या 'टेम्पल्स ऑफ गोवा' मध्ये याला पद्मशिला असे म्हटले आहे. समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी जेव्हा अवतीर्ण झाली तेव्हा देवीच्या हाती कमलपुष्प होते. भारतीय शास्त्रांमध्ये कमलपुष्प हे शुद्धता, अध्यात्मिक शक्ती आणि संपन्नतेचं प्रतीक मानले जाते. त्यामुळे हिंदू मंदिर शैलीमध्ये यास अत्यंत महत्व आहे. बहुतांशी हिंदू मंदिरांमध्ये कमलपुष्पास मनाचे स्थान दिले आहे. सभामंडपाच्या छताला असलेले झुंबर शिल्प एकूण आठ कमल पाकळ्यांनी मंडीत असून प्रत्येक कमलदल पाषाणी शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. आठपैकी सहा कमलदले एकसारख्या नक्षीकामाने सजवली असून दोन कमलदले काहीशा वेगळ्या पण अतिशय सुंदर नक्षीकामाने सजवली आहेत. प्रत्येक कमलदल अष्टकोनी आहे. इतक्या बरकाव्याने साकारलेले या मंदिरावरील हे एकमेव शिल्प. मंदिरावरील इतर काही शिल्प रचना या शिल्पशास्त्रीय दृष्टीकोनातून निःसंशय अजोड आहेत पण हे शिल्प त्याहीपेक्षा काकणभर सरस आहे. चार मुख्य खांबांवर उतरत्या अंगाच्या अजस्त्र आशा दगडी तुळयांनी हा सभामंडप मुख्यत्वे तोलून धरला आहे. प्रत्येक आडव्या पाषाणावर असेच एक चार स्तरीय पाकळ्यांचे कमलपुष्प आहे. छताचा हा भाग अवर्णनीय असून त्यांच्यातील सौंदर्यशास्त्राचा आस्वाद घेणारा एखादा रसिक केवळ हे दृश्य नेत्रात साठवून घेत असल्यास नवल नसावे. 


सभामंडपात अंतराळच्या बाहेच्या बाजूला चार देवकोष्टके आहेत. प्रत्येकातील स्थापित देवता वेगवेगळ्या आहेत. यातील एक दक्षिणेकडे, एक उत्तरेकडे तर दोन पूर्वेकडे तोंड करून आहेत. ही देवकोष्टके गर्भगृहात प्रवेषतना भाविकांचे लक्ष वेधून घेतात. बहुतांशी मंदिरांमध्ये अशी देवकोष्टके आपणास पाहायला मिळतात. चारही देवकोष्टकांवरील छोटे स्तंभ हे मुखमंडपातील स्तंभाशी एकरूप झालेले वाटतात करण त्यांची रचना एकसारखी आहे. चारही देवकोष्टकांची शिखरे कदंबकालीन मंदिरांच्या शिखरांप्रमाणे आहेत. यातील दक्षिणेकडील देवकोष्टकात हाती शंख घेतलेली उभ्या असनातील विष्णुमूर्ती असून मूर्तीचे बाहू भग्न झाले आहेत. तरीही एका हाती चक्र घेतलेले स्पष्ट दिसून येते. मूर्तीच्या मुकुटावर देखणे किर्तीमुख असून बाजूबंद, उदरबंद आणि चरणापर्यंत रुळलेली वैजयंतीमाला यांनी संपूर्ण मूर्ती सुशोभित आहे. मूर्तीच्या खलील बाजूस दोन द्वारपाल दिसत असून विष्णुवाहन गरुडही दिसते. उत्तरेकडील देवकोष्टकात पद्मासनात विराजलेली डाव्या सोंडेची श्रीगणेश मूर्ती असून मूर्तीच्या हाती परशु आहे. तर दुसऱ्या हाती मोदक आहे. गणेशाच्या पोटावर असलेली उदरपट्टीका स्पष्ट दिसून येते. 



सभामंडपातून अंतरालप्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या तीनही बाजूंनी दगडी नक्षीदार जाळी असून या जाळीचं शिल्पसौंदर्य अवर्णनीय आहे. जाळीमुळे प्रवेशद्वार खुलून दिसते. 'जलवातायन' उद्देशाने या जाळ्यांची रचना केलेली असते. प्रकाश तसेच शुद्ध हवा गर्भगृहात येण्यासाठी बसवलेल्या या जाळ्या हे मुख्यतः होयसळ, यादव, चालुक्य स्थापत्याचे वैशिष्ट्य म्हटले जाते. प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर दर्शनी बाजूला दोन अत्यंत सुंदर कमलदले उठवली आहेत. हे संपूर्ण द्वार म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. देवकोष्टकांच्या बाजूलाच अंतराळद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन अतिशय सुंदर नागशिल्पे उभी आहेत. उजव्या बाजूच्या शिळेवर एक नाग असून डाव्या बाजूच्या शिळेवर दोन नागांनी एकमेकांना वेढा घातलेला आहे. ही दोन्ही नागशिल्पे मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात. अंतरालप्रवेश केल्यानंतर पुढे आपल्याला मुख्य गर्भगृहात विराजमान असलेल्या प्राचीन, पवित्र शिवपिंडीचे दर्शन होते. गर्भगृह साध्या पाषाणी बांधणीतील असून दिवे ठेवण्यासाठी केलेली पाषाणी रचना वगळता गर्भगृह शिल्पविरहित आहे. फूटभर उंचीची शिवपिंडी काळ्या पाषाणात घडवली असून मन प्रसन्न करणारे दैवी भाव त्यात असल्याचा प्रत्यय येतो. शिवपिंडीवर असलेल्या अभिषेकपात्रातून शीतल जलाची अखंड संततधार होत असते तर दोन्ही बाजूच्या पितळी समयांमधील (लामणदिवे)  मंद प्रकाश गर्भगृहातील धीरगंभीर वातावरणात अधिकच मनमोहक दिसून येतो. इथे येणारा प्रत्येक भाविक लाल टपोऱ्या जास्वंदाचे अर्घ्यदान या शिवपिंडीवर वाहत असतो. त्यामुळे जास्वंदीची मोहक आरास शिवपिंडीच्या अवतीभवती सतत दिसते. पुरातत्व खात्याच्या जाचक नियमांमध्ये खरेतर पूजा अर्चा वगैरे करण्यास बरीच बंधने आहेत मात्र तरीही नियमांचे पालन करून भाविक इथे पुजाकर्म करत असतात. धार्मिक विधीप्रसंगाचे जलनिर्गमन गोमुखातून मंदिराच्या बाहेर होत असते. शांतता हे प्रत्येक शिवमंदिराचे वैशिष्ट्य असते ते इथेही पुरेपूर प्रत्ययास येते.

मंदिराची बाह्यबाजू दोन विभागात विभागली गेली आहे. अर्थात द्विस्तरीय आहे. अंतरालवरील भागास 'सुखासन' म्हटले जाते तर गर्भगृहवर असलेल्या भागास शिखर म्हटले जाते. पुरातत्त्व अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार मंदिराचे शिखर हे 'कदंब नागर शिखर' शैलीतील असून पिरॅमिडसारखी उतरती रचना हे याचं वैशिष्ट्य आहे. पायापासून ते शिखरापर्यंतचा बहिर्भाग हा अर्धस्तंभ प्रकारातील आहे. भिंतीतच पाषाणी शिलखंडांना स्तंभांचा आकार देऊन साधलेली कलात्मक नक्षी हे अस्सल द्राविडी वास्तुकलेची आठवण करून देत असल्याचे पुरातत्व खात्याचे म्हणणे असून मंदिराला असे बाहेरच्या बाजूने भिंतींमध्ये अनेक अर्धस्तंभ आहेत. या स्तंभांमुळे या बाह्यभागाला एक वेगळीच कलात्मक, देखणी, दर्शनी बाह्य सजावट निर्माण झाली आहे. तत्कालीन मंदिर स्थापत्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी हे एक सुंदर अन अनोखे वैशिष्ट्य. मंदिराचा बाह्यभाग शिल्पविरहित असून यादवकालीन मंदिर स्थापत्याची उत्तम झलक त्यात दिसून येते. मंदिर स्थापत्यात उत्तर चालुक्य तसेच होयसळ बांधकाम शैलीही दिसून येते. मंदिराचे द्विस्तरीय शिखर काही उत्तम शिल्पाकृतींनी शिल्पमंडीत आहे. शिखराच्या दक्षिणेकडे ब्रम्हा आणि भैरव यांच्या मूर्ती आहेत. उत्तरेच्या बाजूला लक्ष्मी-नारायण तर पश्चिमेच्या बाजूला नटराज स्वरूपातील नृत्य करणारा शिवशंकर आणि त्रिशूल-डमरू घेतलेली शिव-पार्वती अर्थात उमा-महेश यांची उत्तम शिल्पे आहेत. ही सर्व शिल्पसंपदा शेकडो वर्षे ऊन-वारा-पाऊस यांचा मारा झेलत आहेत परिणामी आता त्यांची झीज झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ब्रह्मदेवमूर्तीचे मुखकमल क्षतीग्रस्त आहे. उमा-महेशाचे शिल्पही झीज झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. यातील सर्वात सुंदर शिल्प म्हणून विष्णूचे शिल्प म्हणावे लागेल. या मूर्तीच्या वर असलेले कीर्तीमुख अत्यंत सुंदर असून भेसूर नेत्र, सुळे अन उग्र चेहरा त्यास साजेसा आहे. भैरव आणि नटराज शिवमूर्ती यांच्याही शिल्परचनेत किर्तीमुख दर्शवले असून विष्णू मूर्तीवरील किर्तीमुखापेक्षा ही काहीशी सौम्य आहेत. विष्णू मूर्तीच्या आजूबाजूला आणखीही काही आकृत्या शिल्पांकीत आहेत. हे जरी शिवमंदिर असले तरीही इथे वैष्णवपंथांच्या मूर्तीही दिसून येतात. त्यामुळे हे शैव-वैष्णव पंथाची सरमिसळ झालेले एक उत्तम मंदिर आहे. पुरातत्वच्या अभ्यासकांना सातत्याने खुनावणारे हे मंदिर अभ्यासनिय आहे. 

या मंदिराच्या परिसरात असलेले गोमंतकातील पुरातत्वीय विशेष म्हणजे इथले मॅगालिथ. मॅगालिथ म्हणजे मोठा दगड. तर 'मेनहिर' म्हणजे लांब उंच दगड. विशेषतः महाराष्ट्र - कर्नाटक - गोवा या पट्टयात तसेच देशाच्या अनेक भागात युद्धात वीरमरण आलेल्या योध्यांची स्मारके जतन करून ठेवण्याची पद्धत होती. या स्मारकांना वीरगळ म्हणतात. अर्थात वीरगळ म्हणजे योध्याच्या अंतिम युद्धप्रसंगाचे पाषाणी स्वरूपातील जतन. यासंदर्भाने पुण्याचे श्री अनिल दुधाने यांचा 'इतिहासाचे मूक साक्षीदार-वीरगळ आणि सतिशीळा' हा उत्तम ग्रंथ अभ्यासनिय आहे. गोव्यातही आदिवासी जमातींनी अशी स्मारके जतन केली आहेत त्यांना मॅगालिथ म्हणतात. मॅनहीर, डोलमेन, ट्रेलिथोन, हुडस्टोन या नावांनीही हे शिलाखंड ओळखले जातात. एक उंच, मोठी शिळा ही या योध्यांची स्मारके. गोव्यात अनेक ठिकाणी अशी शिल्पे आढळतात. तांबडी सुर्ला मंदिराच्या पाठीमागे एका ठिकाणी अशा चार उभ्या, उंच शिळा आहेत. हे आदिवासी जमातींनी आपल्या योध्याच्या स्मृतीसाठी उभारलेले मॅगालिथ. साधारण चौकोनी ते गोलाकार आकार असलेले चार ते पाच फूट उंचीचे शिलाखंड मंदिराच्या १००० वर्षापूर्वीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे. १९८५ मध्ये म्हैसूर येथे झालेल्या पुरातत्व व संग्रहालय विभागाच्या शतकमहोत्सवी परिसंवादात गोवा पुराभिलेख खात्याचे माजी संचालक डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकर यांनी या विषयावर एक विस्तृत शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. गोव्यात असे मॅगालिथ असणे हे गोव्याच्या प्राचीन इतिहासाचे सोनेरी अवशेष आहेत. सुदैवाने पुरातत्व खात्याच्या गोवा परिमंडळाने इतिहासाचे हे अबोल साक्षीदार अगदी उत्तम पद्धतीने संवर्धित केले आहेत.

पोर्तुगीजांच्या धर्मांधतेतून वाचलेले गोव्यातील हे एकमेव मंदिर म्हणावे लागेल. पोर्तुगीज सत्तेने तब्बल साडे चारशे वर्षे इथे अनिर्बंध सत्ता गाजवली. सत्ताकाळात त्यांनी शेकडो हिंदू मंदिरांचा विनाश केला. थोर इतिहास संशोधक प्रायोळकर यांनी त्यांच्या 'गोवा इंक्विझिशन' या प्रसिद्ध ग्रंथात याचा आढावा घेतला आहे. जिथे जिथे शक्य होईल तिथे पोर्तुगीजांनी आपल्या क्रूरतेचे प्रदर्शन मांडले. मौल्यवान मंदिरांचा नाश करून इथला हिंदू बहुल इतिहास कायमचा नष्ट करण्याचा सपाटा लावला.  'गोवा इंक्विझिशन' च्या अन्यायी चौकशी आयोगाने मंदिरांवर विशेष करडी नजर ठेवली. आज पाहत असलेल्या असंख्य ख्रिश्चन धर्मस्थळांच्या जागी पूर्वी भव्य दिव्य हिंदू मंदिरे होती हे कोणाला सांगून खरे वाटणार नाही पण इतिहास साक्षीला आहे. इतके होऊनही तांबडी सुर्लाचे महादेव मंदिर मात्र पोर्तुगीज वरवंट्याखाली येण्यापासून वाचले हे विशेष. याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे या प्रदेशाची भौगोलिक निबिडता. हा प्रदेश घनदाट जंगलांनी व्यापलेला, हिंस्र श्वापदांनी भरलेला आणि आदिवासी जमातीची प्रामुख्याने वस्ती असलेला असल्याने इकडे पोर्तुगीज राजसत्तेच्या सर्वच क्रूर व्हाइसरॉयनी दुर्लक्ष केले. मुख्य म्हणजे अगदी १९३५ पर्यंतही इकडे उत्तम रस्ता नव्हता. मंदिर प्रकाशात आले तेच १९३५ नंतर. तेव्हा पोर्तुगालमधील बदललेल्या राजकीय धोरणांनी जगभरातील पोर्तुगीज अखत्यारीतील प्रदेशात सौम्यता आली होती. पोर्तुगीजांच्या धर्मांधतेला आळा बसला होता. मंदिरांचा विनाश जवळपास बंद झाला होता. तरीही, १८४८ च्या ब्रिटिश सरकारच्या जनगणनेनुसार अखंड गोव्यात केवळ दोन मंदिरे आढळून आली. त्यात पणजीचे महालक्ष्मी मंदिर जे १८१८ नंतर उभारले गेले आणि दुसरे म्हणजे तांबडी सुर्लाचे प्राचीन महादेव मंदिर (इतिहास देवभूमीचा, लेखक - ज्ञानेश्वर मान्द्रेकर) कसेही का असेना पण केवळ हिंदूंचा किंवा गोव्याचाच नव्हे तर भारतवर्षाचा प्राचीन वारसा अखंड राहिला हे आपले सुदैवच. 

या मंदिर संदर्भात एक विशेष घटना अशी की पोर्तुगीज शासन काळात गव्हर्नर जनरल सिन्योर व्हास्साल इ सिल्व्हा याने हे संपूर्ण मंदिर जसेच्या तसे हलवून थोरले गोव्याच्या म्हणजे कदंबांच्या जुन्या राजधानीत स्थलांतरित करण्याची योजना आखली होती. त्यासाठी अगदी प्लॅनही बनवला होता. हा गव्हर्नर स्वतः एक उत्कृष्ट अभियंता होता. त्यामुळे योजना अंमलात आणण्याची त्याची धडपड होती. मात्र काही कारणाने ही योजना बारगळली आणि गोव्याच्या प्राचीन इतिहासाची मोडतोड होता होता वाचली. साळावली धरणाच्या पाण्यात जात असल्याने गोव्यात कुर्डीच्या शिवमंदिराचे स्थलांतर केले आहे. शेवटी, देवत्वाचे एक विशेष स्थानामहात्म्य असते ते असेच सहजी स्थलांतरित करता येत नाही. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेलेला असतो. मंदिराचे गर्भगृह भक्तीच्या माधुर्याने भारलेले असते. 'ॐ नमः शिवाय..' च्या नामजपाणे मंत्रभारीत झालेला असतो. श्रावणी सोमवारचे याचे भक्तिमहात्म्य अगदी पावित्र्याने ओतप्रोत भरलेले असते. हिरवाईने दाटलेल्या गच्च रानात हे पाषाणी शिल्पवैभव अतिशय मनमोहक दिसते.  

तांबडी सुर्लाचा हा मंदिर परिसर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने याची उत्तम निगा राखली गेली आहे. मंदिराभोवती संरक्षित जाळी बसवली गेली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून दगडी फरसबंदी केली आहे. आजूबाजूचा परिसर उत्तम बगीच्याने सुशोभित केला आहे. मंदिरासमोर पुरातत्व खात्याने माहिती फलकही लावला आहे. मंदिर परिसर जंगल झाडीने व्यापलेला असला तरीही अलीकडे प्रशासनाच्या वतीने इथे पोहोचण्यासाठी उत्तम मार्गांची निर्मिती केली आहे. सरकारी वाहतूक व्यवस्था नसली तरीही खासगी वाहनाने इथे येणे अलीकडे सोयीचे झाले आहे. इवल्याशा गोमंतकातील एक उत्तम पुरातत्वीय वास्तुस्थळ म्हणून हे मंदिर आज देशविदेशात ओळखले जाते. गोमंतकात येणाऱ्या पर्यटकांसाठी हा प्रदेश दूरस्थ असला तरीही प्रत्येकाने इकडे आवर्जून आले पाहिजे. सरकार, पुरातत्व विभाग, स्थानिक आणि पर्यटक यांच्या योग्य संगनमताने मंदिराचे प्राचीन वास्तुवैभव सर्वदूर प्रसारित करण्याचे कार्य नक्कीच होईल. आपल्या संस्कृतीची शिल्लक वारसास्थळे पहायची असतील तर इकडे नक्कीच यायला हवे. एक समृद्ध वास्तुवैभव पाहिल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नक्की दिसेल याची खात्री आहे.... जय हिंद. 

संदर्भ: 
स्वानुभवातील स्थलदर्शन
टेम्पल्स ऑफ गोवा आर्किटेक्चरल स्टडी - श्री गोपाळ राव. 
पुरातत्व खात्याचे आंतरजालीय संकेतस्थळ आणि महितीपत्रिका. 
इतिहास देवभूमीचा - ज्ञानेश्वर मान्द्रेकर 
शतकातील गोमंतक - प्रकाशचंद्र शिरोडकर 
गोवा इंक्विझिशन - अ.का. प्रियोळकर
इतिहासाचे मूक साक्षीदार- वीरगळ आणी सतिशीळा - श्री अनिल दुधाणे. 
वृत्तपत्रिय लेख ई.


- संतोष काशीद (मो.९९२३९७५०५३) 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट