दुर्मिळ ग्रंथ अन वाचकांची गळचेपी...

दुर्मिळ ग्रंथ अन वाचकांची गळचेपी... 

दै गोवन वार्ता, 
रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२

भारताला हजारो वर्षांचा लिखित इतिहास लाभला आहे. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे तो सातत्याने हस्तांतरित होत आला आहे. मध्यंतरी काही आक्रमकांनी या इतिहासाला क्षती पोहोचवली असली तरीही हा इतिहासच इतका उज्वल आहे की तो असल्या आक्रमकांना बधला नाही. इतिहासाची ही पाने जपण्यासाठी असंख्य लिखित साधनांचा वापर केला गेला. ही लिखित साधने अनेक माध्यमातून जपली गेली. ताम्रपट, पोथ्या, शिलालेख, भूर्जपत्र, असंख्य प्रकारचे कागद, काष्ठपत्रे, चर्म, अगदी कापडी स्वरूपांतही तो जपला गेला. आज प्राचिनत्वाचे वलय असलेले असे बरेचसे दस्तावेज दुर्मिळ झालेत. हजारो ग्रंथ कालपटावरून नाहीसे झालेत. जुनी पुराणी हस्तलिखिते वाळवीने फस्त केली, त्यातूनही वाचलीच तर गावखेड्यातल्या लोकांनी स्वतःकडील असे जुने दस्तावेज अज्ञानातून जाळून टाकले. हिंदुस्थानच्या साहित्यिक वारशाचे यामुळे किती मोठे नुकसान झाले हे तो एक परमेश्वरच जाणो. 

ग्रंथ दुर्मिळ होणे म्हणजे नेमके काय याविषयी आजही कित्येक पुस्तकप्रेमी अनभिज्ञ आहेत. एखाद्या ग्रंथाची प्रत सहजी मिळत नाही याचा अर्थ तो ग्रंथ दुर्मिळ आहे असा होत नाही. ग्रंथप्रेमी मात्र असा ग्रंथ 'दुर्मिळ' सदरात मोडून जिथे तो उपलब्ध होईल तिथून अव्वाच्या सव्वा किंमत देऊन खरेदी करतात. एखादा ग्रंथ बाजारात भलेही मिळत नसेल मात्र अनेक ग्रंथालयांमध्ये, वैयक्तिक संग्रहात तो उपलब्ध असतो अशा ग्रंथाला दुर्मिळ ग्रंथ म्हणता येत नाही. दुसरे म्हणजे जे ग्रंथ नव्याने मुद्रित केलेत पण त्याच्या प्रति संपल्या आहेत अर्थात तो मुद्रणातीत म्हणजेच आऊट ऑफ प्रिंट झाला असेल तर अशा ग्रंथालाही दुर्मिळ ग्रंथ सदरात मोडता येत नाहीत. डेव्हिड क्लेमेंट नावाच्या पाश्चात्य ग्रंथशास्त्रज्ञाने दुर्मिळ ग्रंथाविषयी काही ठोकताळे बांधताना म्हटले आहे की, 'ज्या ग्रंथाच्या प्रति जगभरात शोध घेऊनही जर दहा पेक्षा अधिक मिळत नसतील तर त्याला अतिदुर्मिळ म्हणावे.' दुर्मिळतेसंबंधी ज्या व्याख्या आपण करतो त्या अन जागतिक स्तरावर असलेल्या व्याख्या यांचा ताळमेळ घातला तर आपण ग्रंथशोध घेण्यात कमी पडतो हे जाणवते. दुर्मिळतेच्या व्याख्या कमी अधिक प्रमाणात का होईना पण बदलत्या आहेत हे एकूण पाहता लक्षात येते.

आपल्याकडेही यासंबंधाने काही प्रचलित प्रवाद आहेत. एखादा ग्रंथ मुद्रित झाल्याचे पुरावे मिळूनही त्याची एकही प्रत मिळत नाही त्या ग्रंथास 'अप्राप्त' म्हटले जाते. ज्या ग्रंथाची एकच प्रत शिल्लक आहे त्याला अनन्य (युनिक) म्हणतात. ज्या ग्रंथाच्या दहापेक्षा कमी प्रति शिल्लक आहेत त्यास अत्यंत दुर्मिळ आणि पन्नास पेक्षा अधिक प्रति नसतील त्यास फार दुर्मिळ असे प्रवाद आपल्याकडे ग्रंथालयशास्त्र मानते. दुर्मिळ ग्रंथ म्हणजे नेमका कोणता ग्रंथ हे पहिले असता ज्याच्या पन्नासपेक्षा अधिक प्रति उपलब्ध असूनही अभ्यासकांस तो मिळत नाही त्यास दुर्मिळ ग्रंथ म्हणावयास हरकत नाही. भारतात सुरुवातीच्या काळात मुद्रण तंत्रज्ञान अगदीच बाल्यावस्थेत होते तेव्हा एखाद्या ग्रंथाच्या फार कमी प्रती छापल्या जात. कालांतराने कमी मागणी, आर्थिक गणिते या बाबी जुळल्या नाहीत तर त्या ग्रंथाचं पुनर्मुद्रण न झाल्याने सदर ग्रंथ अगदीच दुर्मिळ होत असे. दुसरे म्हणजे त्याच्या जितक्या प्रती छापल्या गेल्या त्या कालानुरूप नष्ट होतात अन तो ग्रंथ अधिकच दुष्प्राप्य होऊन जातो. दुर्मिळ ग्रंथांसंबंधात अत्यंत सुंदर विवेचन प्रसिद्ध मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या 'मराठी संशोधन पत्रिका' या नियतकालिकाच्या जुलै-सप्टेंबर २०२२ च्या अंकात केले आहे. अभ्यासू वाचकांनी जरूर वाचावे.

गोव्यात १५५६-५७ च्या दरम्यान छापखान्याचा प्रथम प्रयोग केला गेला. छापखान्याची गरज ही धर्मप्रसाराच्या आत्यंतिक गरजेतून निर्माण झाली. त्यावेळी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्यासाठी म्हणून जलद साहित्य निर्मिती व्हावी या हेतूने छापखाने उपलब्ध केले गेले. हिंदुस्थानातील पहिला मुद्रित ग्रंथ म्हणून ओळखला जाणारा 'दौत्रीन ख्रिस्ता' हा ग्रंथ ख्रिश्चन धर्मप्रसारासाठीच छापला गेला होता. फादर स्टीफन्सचे ख्रिस्त पुराण १६१६ मध्ये रोमन लिपीमध्ये छापले गेले. तत्पूर्वी १६०९ साली लिहिलेल्या हस्तलिखिताची प्रत सध्या गोव्यातील पिलार मॉनेस्ट्रीच्या ऐतिहासिक संग्रहालयात उपलब्ध आहे. पुढे हेच ख्रिस्तपूराण देवनागरी लिपीत छापले गेले ज्याची एक प्रत लंडनमधील मार्सडन विद्यापीठाच्या ग्रंथालयात सापडली. पुणे विद्यापीठाच्या एका अभ्यासकाने त्याची एक झेरॉक्स प्रत भारतात आणली. हा अगदीच अनन्य होता. सुरुवातीचे मुद्रण हे मोडीत असल्याचेही अनेक पुरावे आहेत. मोडी ही प्रचलित लिपी असल्याने सुरुवातीला मोडी मुद्रण झाले हे १७ जुलै १८०२ साली 'बॉम्बे कुरियर' नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या मोडी जाहिरातीवरून समजते. वाचकांच्या अधिक माहितीसाठी म्हणून एक नोंद अशी की, १८६७ साली तत्कालीन ब्रिटिश सरकारने प्रकाशनाच्या नोंदीचा २५ वा दुरुस्ती कायदा संमत केला. त्यानुसार प्रत्येक प्रकाशनाच्या तीन प्रती सरकारकडे पाठवणे बंधनकारक होते. या कायद्यानंतर भारतीय ग्रंथांच्या इतिहासाचे १८६७ पूर्वीचा आणि नंतरचा असे दोन प्रवाह पडले. 

मी स्वतः काही ग्रंथाचा अधून मधून शोध  घेत असतो. यात माझ्या दृष्टीने काही दुर्मिळ सदरात मोडणारे ग्रंथही आहेत. मी अनेकदा ग्रंथाच्या मूळ किमतीपेक्षा सहापट अधिक रक्कम मोजून ग्रंथ घेतले आहेत. सध्या फेसबुक, व्हाट्स अप सारख्या माध्यमांवर असे जुने नवे ग्रंथ उपलब्ध करून देणारे अनेक समूह उपलब्ध आहेत. मुळात आजकाल 'वाचक' अत्यंत चोखंदळ आहेत. तुलनात्मकरित्या पाहिले तर पूर्वीपेक्षा आज वाचक संख्या थोडीफार का असेना पण वाढली आहे हे मान्य करावेच लागेल. ग्रंथांची उपलब्धता ही खरेतर मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असावयास हवी. आशा वेळी जे ग्रंथ सहजी उपलब्ध होत नाहीत ते उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे काम असे समूह आपापल्या परीने करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना प्रशंसले पाहिजेच. मला स्वतःलाही अनेकदा आशा समूहांचा सकारात्मक अनुभव आला आहे मात्र तरीही काही वेळा या समूहांकडून वाचकांची साफ लुबाडणूक केली जाते. दुर्मिळ ग्रंथाच्या नावाखाली काही उपलब्ध ग्रंथही चढ्या मूल्याने विकले जातात. 

मागे मला पिसुरलेकर स्मारक ग्रंथ घ्यायचा होता. वास्तविक पिसुरलेकर स्मारक ग्रंथ वीस पंचवीस वर्षांपूर्वीची एकदा प्रकाशित झाला आहे. अलीकडे पुण्याचे अनिकेत यादव यांनीही दुसरा एक असाच स्मारक ग्रंथ प्रकाशित केला आहे. नव्याने प्रकाशित ग्रंथ ज्या किमतीचा होता त्यापेक्षा दुप्पट किमतीला मी तो विकत घेतला. नंतर अधिक चौकशी केल्यावर कळले की हा ग्रंथ बाजारात उपलब्ध आहे.  श्रीरामजन्मभूमी संदर्भातील दीडशे पृष्ठांचा अवघ्या ७५ रुपयांचा एक ग्रंथ मी तब्बल साडेपाचशे रुपयांना विकत घेतला आहे. तो उपलब्ध नव्हता त्यामुळे एकवेळ समजू शकतो. पण तरीही तब्बल आठपट पैसे देऊन असे एखादे पुस्तक एखाद्याने विकावे का हा प्रश्न उरतोच. आणखीही काही मित्रमंडळींची अशीच उदाहरणे मी ऐकली आहेत. पुस्तक बाजारातील वार्षिक उलाढाल आजही करोडो रुपयांची आहे. अनेक भाषांमधील हजारो-लाखो पुस्तके खरेदि विक्री केली जातात. मात्र दुर्मिळतेच्या नावाखाली असे अव्वाच्या सव्वा किंमत आकारून ग्रंथाची कोणी खरेदी विक्री करत असेल तर त्यावर नक्कीच विचार व्हायला हवा. वाचक, अभ्यासक स्वतःची पदरमोड करून का असेना पण ग्रंथखरेदी करतोच. त्याच्या विश्वासाचा, असहाय्यतेचा अनेकदा गैरफायदा घेतला जातो तो थांबला पाहिजे. 

भारतातील मुद्रणकलेचा इतिहास अत्यंत रंजक आहे. शब्दांचे वलय आपल्याला पूर्वीपासून लाभले आहे. ग्रंथांमध्ये सामावून ते पुढच्या पिढ्यांना काळानुरूप पोहोच होत असते. सर्वभक्षी काळाने गडप केलेले असंख्य मौल्यवान ग्रंथ नष्ट झाल्याने भारताच्या राष्ट्रीय संपत्तीला अतोनात नुकसान झाले आहे. जे काही शिल्लक आहे अन जे नव्याने घडत आहे ते वाचवले, जपले, वाढवले पाहिजे. वि. वा. शिरवाडकर म्हणतात की 'कोणत्याही स्वरूपातील वाङमयीन शब्द माणसाच्या मनाला रंग, आकार दिल्याशिवाय राहत नाही.' त्यामुळेच दुर्मिळ ग्रंथवाङमय जितके सुलभपणे उपलब्ध व्हायला हवे तेवढेच ते सर्वसामान्य वाचकांच्या अर्थकारणासही पेलले पाहिजे ही अपेक्षा. दुर्मिळतेच्या नावाखाली होणारी वाचकांची गळचेपी म्हणजे एक प्रकारची सामाजिक समस्याचं आहे. समाजातील सजग घटकाने याविरोधात जागरूक धोरण अवलंबणे अत्यंत गरजेचे आहे.... 

- संतोष काशीद (मो. ९९२३९७५०५३)

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट