स्वराज्याची त्यागमूर्ती - महाराणी येसूबाई.
स्वराज्याची त्यागमूर्ती - महाराणी येसूबाई.
दै.गोवन वार्ता
रविवार दि. ३० ऑक्टोबर २०२२
तरंग पुरवणी
'निश्चयाचा महामेरू...' छ. शिवाजी महाराज अवघ्या मानवतेच्या उदयाचा महोन्नत महामेरू म्हणून वंदनीय ठरले. शिवाजी महाराजांनंतर छ. शंभूराजांनी आपल्या समर्थ खांद्यावर स्वराज्याचा डोलारा सांभाळला. साक्षात दिल्लीपतीशी दोन हात केलेल्या शंभूराजांनी शिवाजी महाराजांच्या राज्याचा एक तुकडाही शत्रूहाती पडू दिला नाही. चहूबाजूंनी पसरलेल्या शत्रूच्या वेढ्यातून स्वराज्य सुरक्षित ठेवण्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले. शंभुराजेंच्या या युद्धप्रवासात सोबत राहिलेल्या शंभूपत्नी येसूबाई यांच्या त्यागाची महत्ता इतिहासाने आपल्या पानावर अल्पशी का होईना पण नोंदवली आहे. या राजराणीचं अवघं जीवनचरित्र इतक्या चढउताराने भरलेले आहे की एखादी सामान्य स्त्री केव्हाचीच पराभूत झाली असती. मात्र साक्षात शंभूपत्नीला निराश होण्याची परवानगी तत्कालीन काळही देऊ शकला नाही.
कोकण प्रांतातील शिर्के घराण्यातील पिलाजी शिर्के यांची जिऊबाई नावाची चुणचुणीत मुलगी १६६४ च्या सुमारास शिवरायांनी आपली सून करून घेतली. युवराज संभाजीराजांची धर्मपत्नी म्हणून येसूबाई साक्षात शिवछत्रपतींच्या स्नुषा झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या रत्नपारखी राजाने जिऊबाईत भविष्यातील स्वराज्याची धीरगंभीर, दृढनिश्चयी महाराणी पाहिली. येसूबाई नावाने त्यांनी जणू स्वराज्याची लेक घरी आणली. त्यांच्या या विश्वासाला आयुष्यभर जागलेल्या येसूबाई खऱ्या अर्थाने स्वराज्यतारक ठरल्या. येसूबाईंच्या आयुष्यात तणावाचे असंख्य प्रसंग आले. स्वराज्याची महाराणी म्हणून मानमरातब भोगलेल्या येसूबाईंनी आयुष्यातील तब्बल ३० वर्षे मोघलांच्या कैदेत व्यतीत केली. प्रसंगी पोटाला चिमटेही घ्यावे लागले पण तरीही त्यांनी स्वतःचं सत्व, तत्व, गुणत्व पारदर्शी ठेवले. इतिहासाने त्यांच्या या त्यागाची योग्य ती दखल घेतली नाही असेच नेहमी वाटते.
शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीनंतर परतीच्या वाटेवर असताना महाराजांनी संभाजी राजेंना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मथुरेत ठेवले. इकडे स्वराज्यात मात्र त्यांच्या मृत्यूची खबर अगदी बेमालूमपणे पसरवली. यावेळी बालवयातील येसूची झालेली अवस्था शब्दातीत आहे. इथे पतीवर ओढवलेल्या भयान संकटाने हतबल झालेली येसू काळाने पाहिली. तर संभाजीराजांच्या सुखरूप परतीच्या प्रसंगाने हळवी झालेली येसूही इतिहासाने पहिली. शंभूराजे जेव्हा दिलेरखानाच्या गोटात गेले तेव्हा त्यांच्यासोबत येसूबाई नसल्या तरी पतीने वंदनीय शिवाजी राजांच्या स्वराज्याशी प्रतारणा केल्याची भावना त्यांच्या मनी आली असेल. हे सगळे सहन करण्याची शक्ती एका दृढनिश्चयी स्त्रीमध्येच पाहायला मिळते. ती संभाजी राजांची राजकीय खेळी होती की खरेच ते मोघलांच्या गोटात गेले याविषयी इतिहासकारांत मतभेद आहेत पण या घटनेने येसूबाई मात्र धर्मसंकटात सापडल्या असतील हे नक्की.
राज्याभिषेकानंतर झालेल्या जिजाऊंच्या निधनाने येसूबाईंचा एक जेष्ठ आधार हरवला. पुढे झालेला दक्षिण दिग्विजय, यावेळी संभाजी राजांची शृंगारपुरी केलेली सोय आदी घटनांनी येसूबाई राजकारणातले बारकावे शिकत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाने अवघं स्वराज्य पोरकं झालं. ज्या राजाने छोट्या येसूला स्वराज्याची स्नुषा, स्वराज्याची लेक म्हणून रायगडी आणले त्या परमप्रतापी शिवाजी राजांचे निर्वाण हा येसूबाईंच्या आयुष्यातील आणखी एक धक्का. महाराजांनंतर राजपदाचे कायदेशीर वारस म्हणून शिवपुत्र संभाजी राजे गादीवर स्थानापन्न व्हायचे मात्र अष्टप्रधानांच्यामुळे ते सहजी शक्य झाले नाही. यावेळी येसूबाईंनीही स्वतःच्या अधिकारांत काही हालचाली नक्की केल्या असाव्यात. संभाजी राजांनी अंर्तगत सगळी कुटील राजकारणे मोडीत काढून स्वतःस राजाभिषेक करून घेतले. स्वराज्यातील ही सगळी धांदल पाहून येसूबाईंच्या मुळच्याच दृढनिश्चयी स्वभावात आणखी निश्चलता आली नसेल तरच नवल.
संभाजी राजांच्या राजभिषेकानंतर त्यांना आपल्याच लोकांकडून जीवे मारण्याचे प्रयत्न झाले. एकदोनदा समज देऊन, गोड सांगूनही शत्रूवृत्तीत फरक पडत नाही हे पाहून राजांनी कटवाल्यांना हत्तीच्या पायी दिले. शिक्षेनंतर बाळाजी आवजींच्या मृत्यूने कासावीस झालेल्या येसूबाई संभाजी राजांस 'बाळाजी प्रभू मारिले हे उचित न केले...' असे म्हणून घटनेचा जाब विचारतात हे त्यांच्या करारी वृत्तीचे निःसंशय दर्शन आहे. पुढे त्यांच्याच सांगण्यावरून आवजींच्या पुत्रांचे राजांनी भले केले हे इतिहास विदित करतो. आवजींच्या पुत्रांपैकी खंडो बल्लाळांनी गोव्याच्या स्वारीवर असताना महाराजांचा जीव वाचवला होता. संभाजी राजांनी आपल्या या कर्तबगार महाराणीचा सन्मान करताना 'सखी राज्ञी जयती' नावाचा शिक्का प्रदान केला होता. येसूबाई राजकीय बाबींमध्ये स्वतः लक्ष देत असत हे तत्कालीन काही पत्रांतून लक्षात येते.
येसूबाईंच्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक घटना म्हणजे खुद्द छत्रपती संभाजी महाराजांची मोघलांकडून झालेली कैद. मोघली स्वारीमुळे स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवताना छत्रपती संभाजी राजेंना प्रचंड त्रास होत होता. त्यात त्यांना अकल्पितरीत्या संगमेश्वरी झालेली कैद हा समस्त स्वराज्यावर झालेला जबर आघात होता. ही घटना रायगडी जेव्हा येसूबाईंना समजली असेल तेव्हा त्यांची झालेली अवस्था इतिहासातील कोणतेही पान आपल्यापुढे जसेच्या तसे मांडू शकत नाही मात्र एक महाराणी थोडावेळ बाजूला ठेवून एखाद्या सामान्य स्त्रीच्या नजरेने येसूबाईंच्या त्यावेळच्या स्थितीकडे लक्ष दिल्यास त्यांची झालेली घालमेल सहज जाणवेल. डोळ्यांच्या अश्रूंना मोकळी वाट करून देण्यास त्यांच्यातली महाराणी त्यांना परवानगी देत नव्हती, हतबल होण्यास तर काळानेच मज्जाव केला होता. तिशीच्या आतबाहेर असलेल्या येसूबाईंच्या या अवस्थेची कल्पना कोणत्या शब्दात व्हावी.? सगळा इतिहास यावेळच्या क्षणांना निःशब्द करतो.
संभाजी राजांना कैद करून औरंगजेबने त्यांची क्रूर हत्या केली. यामुळे सिंहासन रिक्त झाले. मोकळे सिंहासन शत्रूला उचल खाण्यास मदत करते हे येसूबाई जाणून होत्या त्यामुळेच त्यांनी राजमंडळाशी विचारविनिमय करून स्वतःच्या पुत्राचा हक्क डावलून दिरास म्हणजे राजाराम महाराजांस राजपद देऊ केले. मराठी मुत्सद्यांना ही घटना एकजूट होऊन शत्रूचा सामना करण्याची प्रेरणा देऊन गेली. रायगड शत्रूच्या संपूर्ण वेढ्यात पडण्यापूर्वीच येसूबाईंनी नव्या छत्रपतींना रायगड बाहेर सुखरून काढले. मुलखात फिरून त्यांनी शत्रूस जरब बसवावी तसेच संपूर्ण राजकुटुंब शत्रूहाती सापडू नये म्हणून त्यांनी साधलेले हे राजकारण आजही आपल्याला त्यांच्या त्यागी वृत्तीचे दर्शन घडवते. पुढे राजधानिस करकचून वेढा पडला. येसूबाईंनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजमंडळास तसेच इतरांस अभय देण्याच्या अटीवर राजधानी झुल्फिकारखानच्या ताब्यात दिली. स्वतः मोघली कैद स्वीकारली. त्यांच्यासोबत पुत्र शाहू, शिवपत्नी सकवराबाई आणि अन्यही महत्वाचे सदस्य कैद झाले.
जीवनाच्या एका विशिष्ट टप्प्यात ऐश्वर्य भोगलेली राजराणी, साक्षात शिवछत्रपतींची सून, धर्मवीर संभाजी राजांची धर्मपत्नी कराल काळाच्या कैदेत सापडली. मोगली कैदेत या संपूर्ण राजकुटुंबाचा अनिच्छेने का होईना पण शत्रूफौजेसोबत प्रवास सुरू झाला. सुदैवाने औरंगजेबने या राजकुटुंबाची थोडीफार बडदास्त ठेवली होती. बाल शाहूला नामधारी सप्तहजारी मनसब दिली होती. खर्चाची तंगाई येसूबाईंना अनेकदा सहन करावी लागत असे. त्यांच्या एका पत्रात ही आर्थिक कुचंबणा मांडताना त्या 'हा समय आम्हावरी कठीण पडला आहे...' म्हणतात. १७०७ साली बादशहा औरंगजेबचा मृत्यू झाला. उत्तरेकडे दिल्लीच्या गादीसाठी राजकारणसुरू झाली अन मराठयांना काहीसे मोकळे रान मिळाले. अझमशाहने दिल्लीकडे कूच करताना राजकीय खेळी म्हणून शाहूंना मुक्त केले मात्र राजमंडळातील इतर मंडळींना आपल्याकडेच ठेवून घेतले. अठरा एकोणीस वर्षांनी किमान पुत्राची सुटका झाली ही येसूबाईंसाठी आनंदाची बाब होती. पुढे दक्षिणेत स्थिरस्थावर झाल्यावर शाहूराजांनी राजकीय खेळ्या करत बाळाजी विश्वनाथ वगैरे आसामींच्या साथीने आपल्या मातोश्रींची अन इतर राजबंद्यांची १७१९ मध्ये सुटका केली. १६८९ ला कैद झालेली मराठयांची राणी तब्बल ३० वर्षांनी मोघली कैदेतून मुक्त झाली. इतका असीम त्याग केलेल्या या राजेश्वरीच्या आयुष्यातला जवळपास अर्धा कालखंड असा शत्रूच्या गोटात खितपत पडला हे नक्कीच क्लेशदायक आहे.
येसूबाईंचा कैदेनंतरचा काळ काहीसा स्वस्थतेत गेला. पुत्र शाहूने राजकारणात एकामागून एक चाली करत आपली जरब बसवली होती. दिल्लीपतीही मराठा राजाला दबकून असे. येसूबाई वडीलकीच्या सल्ल्याने शाहूंना राजकारणाचे मार्गदर्शन करत असत. कोल्हापूर अन सातारा या दोन्ही राजघराण्याची आपसी भांडणे मिटवून दोन्ही शाखांमध्ये एकजूट घडवुन आणली. वयपरत्वे १७३० च्या सुमारास येसूबाईंचा मृत्यू झाला. येसूबाईंच्या मृत्यूने शिवप्रभूंचा सहवास लाभलेली राजकुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य हरवली. सुमारे पासष्ठ वर्षांच्या आपल्या जीवनकार्यात येसूबाई तब्बल ३० वर्षे कैदेत होत्या. हा त्याग त्यांनी स्वराज्याच्या भल्यासाठी पत्करला होता. मोडकळीस आलेल्या स्वराज्याची घडी बसवण्यास त्यांची ही कैदेची राजकारणे फलदायी ठरली होती मात्र त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आयुष्याची परवड स्वीकारली होती. त्यागाचे असीम उदाहरण मागे ठेवून येसूबाईंनी स्वर्गीची द्वारे जवळ केली. मराठयांच्या एका ऐश्वर्यसंपन्न, ज्ञानी, धीरोदात्त, दृढनिश्चयी, करारी, विचारी राणीने शिवछत्रपतींची सून अन शंभूपत्नी म्हणून आपल्या अस्तित्वाच्या खाणाखुना मागे ठेवून इहलोकाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने शिवशाहीतील एक मनाचं पान संपलं....
- संतोष काशीद (मो. ९९२३९७५०५३)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा