आदिशक्तीचं जागृत रूप - देवी मरीकंबा.
आदिशक्तीचं जागृत रूप - देवी मरीकंबा.
उत्तर कन्नड प्रांतातील गोकर्ण पासून ८० किमी वर असलेले इतिहासाचा पुरातन वारसा सांगणारे देवस्थान म्हणजे सिरसी मधील प्रसिद्ध श्री क्षेत्र मरीकंबा देवस्थान. सिरसीच्या बस थांब्यापासून अवघ्या दोन किमी वर असलेले हे देवस्थान केवळ कर्नाटकच नव्हे तर आंध्र, तेलंगणा, केरळ महाराष्ट्रातील कर्नाटक सीमेलगतचा भाग आशा मोठ्या प्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विशाल भक्तसागर, जागृत देवस्थान, पुरातन इतिहास अन वास्तूकलेचा सुंदर संगम झाल्यामुळे पूर्वीपासूनच देवस्थानकडे येण्याचा भाविकांचा ओघ प्रचंड आहे. आपल्याकडे दुर्गेची जी जाज्वल्य रूपे पुजली जातात त्यातीलच एक सुंदर दुर्गारुप म्हणजे ही मरीकंबा देवी. या देवीला कर्नाटकातील मरीअम्मा देवीची थोरली बहीण मानले जाते. त्यामुळे ओघानेच ही देवी या प्रांतातील सर्व मरीअम्माची मोठी बहीण म्हणूनच ओळखले जाते. या देवीला रेणुका आणि यलम्मा देवी म्हणूनही ओळखतात. सिरसीसारख्या गजबजलेल्या शहरातील हे एक मुख्य देवस्थान असून कर्नाटक सरकारने या स्थळाला आपल्या पर्यटन स्थळांमध्येही मुख्य स्थान दिलेले आहे. या प्राचीन देवस्थानला नुकतीच आम्ही भेट दिली.
दै. गोवन वार्ता
रविवार दि. १२ नोव्हेंबर २०२२.
तरंग पुरवणी.
मंदिरात अत्यंत सुंदर, लालबुंद वाणाची, टपोऱ्या नेत्रांनी शत्रूच्या हृदयात धडकी भरवणारी अशी अष्टभुजाधारी सप्तफुटी मूर्ती स्थापित आहे. या अष्टभुजा मरीकंबा देवीच्या उत्पत्तीविषयी असे सांगितले जाते की आदी शंकराचार्य हे दक्षिण भारत यात्रेवर असताना त्यांचा मुक्काम सागरक्षेत्री पडला. इथे त्यांना या देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि आपल्याला जमिनीतून बाहेर काढून स्थापना करावी असे शंकराचार्यांना आदेश दिला. देवीने दिलेल्या दृष्टांतानुसार शंकराचार्यांनी हनगल जवळील एका तलावातून ही मूर्ती बाहेर काढली. मात्र तिची यथास्थित स्थापना करण्याचे कार्य तत्कालीन युद्धप्रचुर परिस्थितीमुळे होऊ शकले नाही. पुढे या मरीकंबा मंदिराची उभारणी १६८९ मध्ये विजयनगर साम्राज्याचा मांडलिक आणि इक्केरी परंगण्याचा प्रमुख असलेल्या सदाशिवराय दुसरा याने केली. तळ्यात सापडलेली देवीची मूर्ती त्यांनीच मंदिरात स्थापन केली. तेव्हापासून अव्याहत इथे देवीची पूजापठण होत आहे.
अगदी अलीकडे सिरसी मधील या देवस्थानाच्या स्थलांतराचा प्रयत्न झाला मात्र त्यावेळीच या परिसरात प्लेगची भयंकर साथ पसरली. असंख्य मुले, पुरुष, स्त्रिया या साथीने मृत्युमुखी पडले. हा मृत्यूसंहार इतका प्रचंड होता की अनेक घरांमधील कोणीही यात शिल्लक राहिले नाही. देवीच्या मूळ स्थळाचे स्थलांतर करण्याचे नियोजित असतानाच झालेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि हा देवीचाच प्रकोप असल्याची सर्वांची भावना झाली. अर्थात यामुळे देवीचे स्थलांतर करण्याचे संपूर्णतः बारगळले. वास्तविक कोणत्याही स्थळाचे एक स्थानमहात्म्य असते ते असे सहजी बदलत येत नाही हेच यानिमित्ताने दिसून आले. मुख्य मंदिराला जोडूनच पुढे एकोणिसाव्या शतकात सभागृह बांधले गेले. याला विपश्यना केंद्रही म्हणतात. हे सभागृह चारही बाजूंनी देवीच्या मूर्तींनी सुशोभित आहे. सभागृहात आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून थेट चोवीस तास देवीचे दर्शन घेण्याची सोय केली आहे. भक्तांना विश्रांती तसेच मुखदर्शनाची सोयही इथेच केली गेली आहे.
मंदिर इतिहासात आणखी एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. १९३४ मधे महात्मा गांधी यांनी या परिसरात असूनही मंदिराला भेट देण्यास नाकारले होते. गांधीजींच्या या नकाराला एकमेव कारण होते ते इथल्या द्विवार्षिक रथोत्सवात दिल्या जाणाऱ्या पशुबळीची प्रथा. मरीकंबा देवीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे द्विवार्षिक रथोत्सव. वास्तविक हा संपूर्ण कर्नाटकातील सर्वात मोठा रथोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. प्रत्येक दोन वर्षांनी इथे मार्च महिन्यात देवीची रथातून सवाद्य मिरवणूक निघते. देवस्थानचे सगळे विश्वस्त, भक्तगण, सरकारी पातळीवरील अधिकारीवर्ग असा झाडून सगळा भक्तगण मोठ्या उत्साहाने या रथोत्सवात सहभागी होत असतो. या रथोत्सवातील एक प्राचीन प्रथा म्हणजे पशुबळी. देवीने केलेल्या महिषासुर मर्दनाचे प्रतीक म्हणून अशाच एका बलदंड महिषाचे शीर या रथोत्सवादरम्यान केले जाते. महात्मा गांधीजींनी या प्रथेला विरोध केला. त्यासाठी त्यांनी मंदिर व्यवस्थापनातील लोकांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पुढे हा प्रश्न केवळ पशुबळीपुरताच मर्यादित न राहता गांधीजींनी अस्पृश्यता निवारण आणि दलितांच्या मंदिर प्रवेशाला असलेला विरोधही संपवावा म्हणून सर्वांना कळकळीची विनंती केली. गांधीजींच्या या प्रयत्नांना स्थानिकांनीही चळवळीच्या रुपात समर्थन दिले. तात्काली काळात झालेली ही चळवळ परिणामकारक ठरली आणि व्यवस्थापनाने दोन्ही निर्णय अंमलात आणले आणि पशुबळीही थांबली तसेच दलितांचा प्रवेशही सुकर झाला.
मंदिरातील देवीची मुर्ती जवळपास आठ फूट उंच आहे. व्याघ्र अर्थात वाघ हे देवीचे वाहन असून देवीच्या तसेच वाघाच्याही चेहऱ्यावर अत्यंत कुद्ध भाव आहेत. देवीच्या मुखावर युध्दावेश असलेले संतापी भाव असून त्यामुळे दुरुनही भक्तांना विस्मयचकित करणाऱ्या देवीची विशेष अनुभूती इथे येते. देवीच्या आठही हातात तलवार, भाला, ढाल, त्रिशूल, डमरू अशी विविध शस्त्रे आहेत. दैत्यसंहार करणाऱ्या मुद्रेत असलेली ही देवी विनाशी राक्षसांच्या समूळ नाशासाठी सदैव तत्पर असते असे आजही मानले जाते. शत्रूविनाश करण्यासाठी तत्परतेने निघालेली देवीची काया पाहणाऱ्याला स्तिमित करून सोडते. ही मूर्ती साडे तीन शक्तिपीठांपैकी असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवीसारखी असून अंगावर शेंदूर असल्याने लालबुंद दिसते. तिच्या या शेंदूरचर्चित रुपामुळे मूळचे क्रोधीत रूप अधिकच क्रोधीत आसल्यासारखे भासते. मुख्य गाभाऱ्यात स्थापित असलेल्या या अलौकिक देवीच्या मागे मकरमुख असलेली चांदीची अतिशय सुंदर, नक्षीदार प्रभावळ असून त्यामुळे तिचे रूप अधिकच खुलून दिसते. या प्रभावळीवर देवीच्या अनेक रुपांना प्रदर्शित केले गेले आहे. दोन्ही बाजूला कायम तेवत असलेल्या सुंदर समया देवीचं रूप अधिकच खुलवतात त्यामुळे अनेकदा पाहूनही तिची मुद्रा पाहताच रहावी अशी भाविकांच्या मनात इच्छा निर्माण होते.
कावी रंगसंगतीचा उत्तम मिलाफ असलेले हे मंदिर असून बाहेरच्या संपूर्ण बाजूंनी उत्तम अशी कावी रंगकला मंदिराच्या मूळ सौंदर्यात आणखी भर घालते. इथल्या प्रत्येक भिंतीवर अशी कित्येक भित्तीचित्रे असून अत्यंत सुंदर आहेत. संपूर्ण कलाकाम गडद तांबड्या रंगात असून दुरून पाहताना मंदिर म्हणजे जास्वंदीच्या फुलात उभारलेले एक मोहक वास्तुवैभव असल्याचे भास होतो. आज ही कावी रंगसंगती हीच या मंदिराची दर्शनी ओळख झाली आहे. कर्नाटक प्रांतातील एक उत्तम देवस्थान म्हणून मरीकंबा देवस्थान सुप्रसिद्ध झाले आहे.
मंदिर परिसरात काही माहिती फलक दर्शविले आहेत. त्यातील जवळपास सगळेच कन्नड भाषेत असल्याने इतर भाषिकांना त्यावरील मजकूर समजताना अडचण होते त्यामुळे देवस्थानाने इथे इंग्रजी आणि हिंदी किमान या दोन भाषांमध्ये तरी असे फलक उभरावेत असे वाटते. काही नैमित्यिक पूजापाठ वगळता हे मंदिर वर्षभर भक्तांसाठी खुले असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा या परिसरात जाणे होईल तेव्हा आवर्जून आदिशक्तीच्या या एका जागृत देवस्थानच्या सावलीत क्षणभर जरूर थांबावे. देवीच्या कृपाशीर्वादाचा वरदहस्त मिळाल्याचे समाधान नक्की मिळेल. तिच्या मुखचर्येला पाहून मुखातून अकल्पितपणे देवीस्तुती वदली जाते... 'या देवी सर्व भुतेशु.... नमस्तस्ये... नमस्तस्ये..'
- संतोष काशीद (मो. ८९२३९७६०५३)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा