आनंदाश्रूंनी मोहोरलेला प्रतापगड....

आनंदाश्रूंनी मोहोरलेला प्रतापगड....

दै.गोवन वार्ता 
रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२
तरंग पुरवणी


छत्रपती शिवरायांनी लाखो मावळ्यांच्या रक्ताभिषेकाने, त्यागाने, बलिदानाने स्वराज्याचा पवित्र कैलास उभारला. गोरगरिबांचा, दिनदुबळ्यांचा पालनकर्ता म्हणून महाराजांना अवघा जनमानस ओळखू लागला. हे स्वराज्य घडवताना आलेली पहाडासारखी अवाढव्य, बलदंड, आक्राळविक्राळ संकटे त्यांनी जिद्दीने परतवली. असेच महाकाय संकट म्हणजे आदिलशाही सरदार अफजलखानची स्वारी. अफजलखान स्वराज्यावर चालून आला तोच मुळात महाराजांचा समूळ नाश करण्याच्या उद्देशाने. मात्र, १० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या झटापटीत अफजलखान इवल्याशा मराठा सत्तेकडून मारला गेला. आपल्या जीवाची बाजी लावून खुद्द शिवरायांनी से संकट चारीमुंड्या चित केले. शिवाजी महाराजांच्या या धाडसी कार्यामुळेच महाराष्ट्र धर्म वाचला म्हणावे लागेल. 

'शत्रूच्या मृत्यूनंतर शत्रुत्वही संपले' या नीतीने महाराजांनी अफजलखानाच्या मृत्यू पश्चात प्रतापगड पायथ्याशी त्याची कबर बांधली. ही कबर म्हणजे शिवरायांच्या अचाट कर्तृत्वाची प्रत्यक्ष साक्षीदार होती, अन्यायी सत्तेच्या मस्तवाल सरदाराला धाराशायी केलेल्याची निशाणी होती. ही कबर एका धाडसी योजनेच्या परिपूर्णतेचं अगदी जिवंत स्मारक होते. तत्कालीन महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय, ऐतिहासिक क्षेत्रात ही घटना एक आश्चर्य मानले जाते. कोणतीही बरोबरी नसताना बलाढय अफजलखान मारला गेला ही बाबच अविश्वसनीय होती.

मूळ अवघ्या काही चौरस फूट असलेली ही कबर पूढे मात्र वाढत गेली. रानावनात वाढलेली जंगली घाणेरी जशी बेभान पसरत जाते अगदी तशीच ही कबरही फोफावत गेली. तिच्या आजूबाजूला पक्क्या कमानीदार भिंती, ओवऱ्या झाल्या. जाळ्या लावून सुशोभीकरण केले गेले. अगदी यासाठी एक संस्थासुद्धा उभारली गेली. हे सगळं राजरोस, सर्वांच्या डोळ्यादेखत घडवले गेले. ईथे दिवाबत्तीची सोय करून खानाच्या मृतात्म्याला अगदी हवा तो भोग दिला जात होता. हे सगळं असह्य होते. ज्या छत्रपतींनी महाराष्ट्र टिकावा म्हणून स्वतःच्या छातीवर अफजल्याचे खंजीर झेलले त्याच छत्रपतींच्या बालेकिल्ल्यात ही अंदाधुंद अतिक्रमणे होऊ लागली. जिथे साक्षात शिवाप्रताप घडला तो प्रतापगड हे सगळं असहाय होऊन भिजल्या नेत्रांनी पाहू लागला. महाराष्ट्रात आवाज उठवला जाऊ लागला पण सत्तेच्या, मतांच्या, अन दडपशाहीच्या राजकारणात हे असले आवाज दाबले जातात हे अजवरचं सत्य खरे ठरले. खानाची कबर वाढतच होती. शिवप्रेमींचा आवाज दाबला जात होता. 

आपल्याकडे मतांची लाचारी हा अत्यंत भयंकर रोग आहे. प्रत्येक राजकीय व्यासपीठ या रोगाने ग्रस्त आहे. कसेही करून या सतरा टक्क्यांचे समर्थन मिळवायचे म्हणून असले अनैतीहासिक चोचले पुरवण्याचे उद्योग सत्तेत आलेल्यांनी केले. काही विशिष्ट पक्ष तर स्वतःची अस्मिता, इतिहास, तत्व सगळे विसरून हे टक्केवारीचे गणित मांडू लागले. ही त्यांची गरजच या असल्या नसत्या इमारतींच्या भिंतींवर मनोरे उभारू लागली. अफजलखान थडगे हे काही एक उदाहरण नाही. आज विशाळगड आक्रसतोय, बादशाही थाटाची बांधकामे आपल्या उरावर उभी झालेली पाहतोय. कसलाही ऐतिहासिक आधार नसलेल्या बांधकामांच्या पायांनी त्याच्या मस्तकात शेकडो आघात होत आहेत अन हे तो जुलमाने सहनही करतोय. हीच अवस्था लोहगड, चंदनवंदन आणि अशा शेकडो गडकोटांची होत आहे. खुद्द शिवतीर्थ रायगडवरही काही माथेफिरूंनी असा प्रकार केला होता. हिंदुत्ववादी युवकांनी प्रशासनाच्या, पोलिसांच्या मदतीने तो प्रयत्न उधळूनही लावला होता. सगळेच गडकोट या अशा अनधिकृत बांधकामांना जबरदस्तीने सोसत आहेत. डोळ्यांची असावे गाळण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीही नाही. ज्या दिवशी शिवप्रताप घडला त्याच दिवशी अफजलखान कबर उखडली हे यामुळेच अतिशय महत्वाचे ठरते.

अफजलखान कबर हटवण्यामुळे या प्रश्नाकडे अधिक लक्ष वेधले जाऊ शकते. सत्तेच्या आणि कायद्याच्या परिघात राहून हे गडकोट आशा बेकायदेशीर बांधकामांपासून मुक्त करायला हवेत. सध्या प्रतापगड झालाय पुढे आणखी होतील ही आशा बळावली आहे. या बांधकामांची आणखी एक खासियत म्हणजे यांची तात्काळ होणारी उभारणी. इकडे पैसे येतो कुठून, स्रोत काय, एकही अपुरे बांधकाम दिसू नये म्हणून प्रयत्न करणारी अशी कोणती ताकद आहे याचा शोध घेऊन त्यावरही चाप लावायला हवा. कारण, एका कबरी भोवतालचे बांधकाम उखडले म्हणून खुष होण्यापेक्षा अशी बांधकामे होऊच नयेत याची खबरदारी घेणे केव्हाही शहाणपणाचे ठरेल. 

अफजलखान कबरीचे शंभर वर्षांपूर्वीचे एक छायाचित्र समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. त्यात एक कबर दिसत आहे. आता मात्र तिथे दोन झाल्या आहेत यामागचे करण काय, दुसरी कबर कोणाची याचीही चौकशी व्हायला हवी. सध्या अतिक्रमण हटवल्यानंतर तिथे लाल कपड्यात झाकलेल्या दोन कबरी आपल्याला दिसत आहे. दोन्ही कबरींची विज्ञानाच्या कसोटीवर शास्त्रीय तपासणी झाली पाहिजे. या कारवाईसाठी शिंदे सरकार, सातारा जिल्हा प्रशासन, पोलीस यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. इतकी वर्षे चिघळलेला हा प्रश्न एकदाचा निकाली निघाला हे चित्र अत्यंत आश्वासक आहे. 

कबर हटवल्यानंतर आता प्रतापगड आनंदाने मोहरला आहे. आपल्याला पुढे त्या मोकळ्या जागेत आपल्याला काही उत्तम करता येईल. विशेषतः इथे अफजलखान वधाची एक संपूर्ण शिल्पमालिकाच उभारता येईल अन हे येणाऱ्या पिढ्यांना अत्यंत मार्गदर्शक ठरेल. सरकारनेही याचे संकेत दिले आहेत. महाराजांची खानाशी झालेली भेट, दगा, वाघनखांचा उपयोग, जीवा महालेसारख्या इतरही मावळ्यांची तत्परता, सैन्याची कारवाई हे सगळे इच्छा असेल तर उभारता येईल. हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल. असो, अफजलखान वधाची घटना इतकी महत्वाची होती की त्याचा दूरगामी परिणाम दिसून येणार आहे. परमानंदाने शिवरायांच्या तोंडी एक स्वगत घातले असून त्यात शिवराय म्हणतात की, जो सर्व धर्माचा निषेध करून अधर्माची वाढ करत आहे आशा त्या समीप आलेल्या अफजलखानास मला मारलेच पाहिजे. यावरून या घटनेचे महत्व अधोरेखित होते....

निषेद्धा सर्वधर्माणामधर्माणां विवर्धकः
स मया हंत हंतव्य: समया समुपागतः ||

- संतोष काशीद (९९२३९७५०५३)

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट