सहस्रलिंग - गुढतेचं वलय लाभलेले प्राचीन रुद्रतीर्थ.

सहस्रलिंग - गुढतेचं वलय लाभलेले प्राचीन रुद्रतीर्थ. 

भारतात असंख्य स्थळे आहेत ज्यांच्या इतिहासात कितीही पोखरले तरीही मूळ सापडत नाही. अनेकदा आशा स्थळांभोवती दंतकथांचं जाळं पसरलेले असते. या दंतकथा समाजाच्या मौखिक प्रचाराचे साधन असतात. त्याभोवती पसरलेल्या गूढ वलयाला छेद देता येत नाही. गुढतेचं वलय लाभलेले, दंतकथांचं मोहोळ उठलेले अन आजही अतर्क्य असे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील भैरुंबे गावाच्या हद्दीतील प्रसिद्ध सहस्रलिंग हे स्थळ पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. गावच्या बाजूने वाहणारी अत्यंत सुंदर 'शाल्मला' ही अवघ्या सोळा किमीचा प्रवाह मार्ग असलेली नदी आपल्या उदरातील महाकाय शिलखंडांवर  तब्बल एक हजार शिवलिंगांच्या इतिहासाचा असा एक अमूल्य ठेवा अभिमानाने जतन करून वाहत आहे. शाल्मलेच्या या अवखळ नदीपात्रात असलेली शिल्पसंपदा पाहणारा मात्र क्षणभर स्तब्ध होऊन जातो. हे आगळं वेगळं शिल्पवैभव या अशा नदीपात्रात कोणी निर्माण केले असेल, त्यामागचं प्रयोजन काय असावं, कोणत्या काळातील ही शिल्परचना असावी, याचं धार्मिक, पौराणिक महत्व नेमकं काय असावं आशा असंख्य प्रश्नांनी इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात या स्थळाविषयीची उत्सुकता चाळवली जाते.

दै. गोवन वार्ता 
रविवार दि. ०४ डिसेंबर २०२२


इतिहास अभ्यासकांना लिखित साधना अभावी आजही इथे काही हाती लागत नाही. यासंदर्भात काही दंतकथा मात्र या परिसरात ऐकायला मिळतात. सोंधे परगण्याचे राजे सदाशिवरायला पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यामुळे राजाने एका ऋषींचा अनुग्रह घेतला. ऋषींच्या उपदेशानुसार पुत्रप्राप्तीसाठी शाल्मला नदीच्या शीतल जलधारेत आकंठ बुडालेली एक हजार शिवलिंगाची निर्मिती त्यास करावयाची होते. या स्थळाला सहस्त्रलिंग हे नामाभिदान मिळाले ते यामुळेच. 


शाल्मला ही एक छोटी नदी बेडथी सारख्या दक्षिण वाहिनी मोठ्या नदीची उपनदी. तिचे संपूर्ण पात्र शिल्पकलेसाठी उत्तम असलेल्या महाका, काळ्याशार बेसाल्ट पाषाणांनी भरलेले. हा पाषाण शिल्पकलेसाठी कठीण, सहजी दाद न देणारा. यावर निर्माण झालेली शिल्परचना काळाच्या कसोटीवर टिकून राहते. दक्खनची शिल्पकला हजारो वर्षे टिकून राहिलेली आहे ती यामुळेच. नदीपात्र अत्यंत प्रवाही, अवखळ अन उफानलेले असल्याने प्रवाहात शिरताच आपण ओढणीला लागतो याचा प्रत्यय आम्हीही घेतला. 


सदाशिवरायने असंख्य मूर्तिकार, पाथरवट कामाला लावून शिवलिंगांना घडवण्याचे कार्य सुरू केले. हे काम पुढे काही वर्षे चालले मात्र ते पूर्णत्वास जाण्यापूर्वीच राजाचे निधन झाले. निर्माण झालेली शिवलिंग नदीच्या पात्रात तशीच राहिली. आणखी एका दंतकथेनुसार ही शिवलिंग एका रात्रीत घडवण्याची अट होती. मात्र एक हजार शिवलिंग संख्या पूर्णत्वास जाण्यासाठी एक बाकी असताना सुर्यदेवांनी दर्शन दिले अन त्यांची निर्मितीही थांबली. परिसरात असलेल्या आणखी एका आख्यायिकेनुसार या शिवलिंगाची निर्मिती स्वयंभू आहे.


दंतकथा काहीही असल्या तरीही आज इथली शिल्पसंपदा इतिहासाचा अतिशय मौल्यवान वारसा आपल्यासमोर उलगडून दाखवत आहे. या शिल्पांनी अभ्यासकांना नक्की भुरळ घातली आहे. इथली काही शिल्परचना इतक्या विलोभनीय आहेत की त्यांना पाहतच राहावे असे एखाद्याला वाटल्यास नवल नसावे. अनेक पाषाणावर शिवलिंग आणि अगदी समोर नंदी अशी पूर्ण शिल्परचना आहे. काही पाषाण केवळ नंदीला घेऊन घडवले आहेत तर काही पाषाणावर केवळ शिवलिंग घडवलेले आहेत. प्रत्येक शिल्परचना आखीव रेखीव, प्रमाणबद्ध अन धार्मिकतेचा परिपूर्ण अंश असलेली. या एकूण शिल्पसमूहातील सर्वात सुंदर आणि महाकाय शिल्प म्हणजे चौदा फूट लांब, सात फूट रुंद आणी सुमारे तीन ते चार फूट जाड असलेल्या पाषाणावर अर्धवट अवस्थेत घडवलेले नंदीशिल्प. 

पुढचे पाय मुडपून उजव्या बगलेवर कललेले हे अपूर्णावस्थेतील नंदीशिल्प मला शिवतीर्थ रायगडवर असलेल्या जगदीश्वर मंदिरासमोरील नंदीशिल्पासारखे वाटले. गळ्यात सुरेख धातूची साखळी असून साखळीला जोडलेला घाटही अतिशय उठावदार आहे. पाठीवर आणि मस्तकावर अशीच सुंदर शृंखला कोरलेली आहे, रुबाबदार वशिंड, ऐटदार बैठक, फुगलेल्या नाकपुड्या, अन टपोरे डोळे त्याच्या मूळ सौंदर्यात आणखी शंभर पटींनी भर घालत आहेत. याच नंदीच्या उरलेल्या पाषाणावर ब्राह्मीसदृश लिपीमधील शिलालेख कोरलेला आहे. याचे वाचन झाले आहे किंवा नाही याबाबतीत सध्यातरी कल्पना नाही. इतर काही भग्न अन भव्य शिवलिंगही इथे अस्ताव्यस्त पडलेली आहेत. अनेक ठिकाणी फुलांची नाजूक नक्षी कोरलेलीही दिसून येते. 


आज जिथे ही शिवलिंग आहेत तिथून शाल्मला नदी प्रवाहाच्या दोन्ही बाजूला आठ किमी अंतरात ही शिवलिंग आढळतात असे म्हटले जाते. आम्ही जिथे होतो तो भाग हा सद्य स्थितीत सर्वाधिक शिवलिंग असलेला भाग असल्याचे म्हटले जाते. असे असले तरीही आजही इथे दृश्य असलेल्या शिवलिंगाची तसेच इतरही शिल्पांची संख्या शंभरच्या आतबाहेर आहे. एक हजार शिल्परचना असलेला हा परिसर सध्या केवळ काही शे शिल्परचनाच दर्शवतो. 

सुंदर झुुुलता पूूूूूल.

बाकीची शिल्पे, शिवलिंग आज तरी इथे कुठेही दिसत नाहीत. अर्थात इतक्या प्रदीर्घ वर्षांच्या कालौघात यातली बरीचशी शिल्पे पाण्याच्या प्रवाहात दबली गेली असण्याची शक्यता आहे. एक वंदता अशीही आहे की यातली उत्तमोत्तम शिवलिंगे आजूबाजूचे लोक घेऊन गेली आहेत. हे सत्य असेल तर हा एक गंभीर अपराध आहे. 


पर्जन्यऋतूत जेव्हा शाल्मलेच्या पात्राने स्वतःला अगदी तुडुंब भरून घेतलेले असते त्यावेळी एकही शिल्प दृष्टीस पडत नाही. त्यामुळेच इथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत असतो. शाल्मलेवर सहस्त्रलिंगच्या अगदी बाजूलाच एक अतिशय सुंदर असा केबलचा झुलता पूल बांधला आहे. सकाळच्या थंड, निरव, शांत, उत्साही आरोग्यदायी वातावरणात या पुलावरून नदीपत्राचे मन प्रफुल्लित करणारे दर्शन घ्यावे. महाशिवरात्रीला इथे हजारो भक्तांची अक्षरशः झुंबड उडालेली असते. प्रत्येक शिवलिंगावर पूजेचा, फुलांचा दुधाचा अभिषेक होत असतो. सहस्त्रलिंग हे आजही पूर्वीसारखेच गूढतेचा अनामिक पडदा ओढून निवांत पडलेले रुद्रतीर्थ आहे. त्याची हीच गूढता प्रत्येकाला तिकडे खेचून घेते. प्रत्येकाने या स्थळी भेट देऊन इथल्या ऐतिहासिक वारशाचं दर्शन जरूर घ्यावे एका वेगळ्या दैवी वातावरणाची अनुभूतीची अगदी नक्की येईल. 

- संतोष काशीद (मो. ९९२३९७५०५३)

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट