सहस्रलिंग - गुढतेचं वलय लाभलेले प्राचीन रुद्रतीर्थ.
सहस्रलिंग - गुढतेचं वलय लाभलेले प्राचीन रुद्रतीर्थ. भारतात असंख्य स्थळे आहेत ज्यांच्या इतिहासात कितीही पोखरले तरीही मूळ सापडत नाही. अनेकदा आशा स्थळांभोवती दंतकथांचं जाळं पसरलेले असते. या दंतकथा समाजाच्या मौखिक प्रचाराचे साधन असतात. त्याभोवती पसरलेल्या गूढ वलयाला छेद देता येत नाही. गुढतेचं वलय लाभलेले, दंतकथांचं मोहोळ उठलेले अन आजही अतर्क्य असे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील भैरुंबे गावाच्या हद्दीतील प्रसिद्ध सहस्रलिंग हे स्थळ पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. गावच्या बाजूने वाहणारी अत्यंत सुंदर 'शाल्मला' ही अवघ्या सोळा किमीचा प्रवाह मार्ग असलेली नदी आपल्या उदरातील महाकाय शिलखंडांवर तब्बल एक हजार शिवलिंगांच्या इतिहासाचा असा एक अमूल्य ठेवा अभिमानाने जतन करून वाहत आहे. शाल्मलेच्या या अवखळ नदीपात्रात असलेली शिल्पसंपदा पाहणारा मात्र क्षणभर स्तब्ध होऊन जातो. हे आगळं वेगळं शिल्पवैभव या अशा नदीपात्रात कोणी निर्माण केले असेल, त्यामागचं प्रयोजन काय असावं, कोणत्या काळातील ही शिल्परचना असावी, याचं धार्मिक, पौराणिक महत्व नेमकं काय असावं आशा असंख्य प्रश्नांनी इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या...








